वरुण चक्रवर्तीचा वनडे संघात समावेश होण्याची शक्यता
पहिल्या सामन्याआधी सरावासाठी संघात दाखल, संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर समावेश अवलंबून
वृत्तसंस्था/ नागपूर
फॉर्ममध्ये असणारा भारताचा स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केल्याने तो ओघ कायम रहावा यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीही चार स्पेशालिस्ट स्पिनर्सपैकी एकाऐवजी वरुण चक्रर्तीला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कुलदीप व वाशिंग्टन सुंदर यापैकी एकाला वगळले जाऊन वरुणला संधी मिळू शकते. मात्र वनडे मालिकेतील कामगिरीच्या आधारावर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. या स्पर्धेसाठी अंतिम संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुणने 14 बळी मिळवित मालिकावीर पुरस्काराचा बहुमान मिळविला. मात्र इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली नव्हती.
मंगळवारी तो सरावावेळी ट्रेनिंग घेत असल्याचे आणि नेटमध्ये गोलंदाजी करीत असल्याचे दिसून आले. ‘वरुण चक्रवर्ती हा संघाचा एक सदस्य आहे,’ असे संघाचा उपकर्णधार शुभमन गिल सरावानंतर झालेल्या पत्रकार परिषेदत म्हणाला. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत यासारख्या फलंदाजांना गोलंदाजी करून तो लयमध्ये रहावा, असा विचार करून प्रशिक्षक गंभीर यांनी वरुणला संघात स्थान दिल्याचे समजते.
12 फेब्रुवारी ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख असून या संघात वरुणची वर्णी लागण्याची जास्त शक्यता असल्याचे मानले जात आहे. मात्र एकही वनडे सामना न खेळता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची निवड होणे अशक्य आहे. भारतीय संघात तीन फिंगर स्पिनर्स आहेत, त्यात दोन डावखुरे (रवींद्र जडेजा व अक्षर पटेल) व एक उजव्या हाताने गोलंदाजी करणारा ऑफस्पिनर वाशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. गेल्या आक्टोबरमध्ये स्पोर्ट्स हर्नियावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुलदीप यादवचे संघात पुनरागमन झाले आहे. तो या संघातील एकमेव मनगटी स्पिनर आहे.
‘सध्या तरी वरुणला इंग्लंडच्या मालिकेआधी फलंदाजांना गोलंदाजीच्या सरावासाठी व्यवस्थापनाच्या इच्छेनुसार संघात सामील करण्यात आले आहे. तो कसोटीमध्ये अद्याप खेळलेला नाही,’ असे बीसीसीआयमधील वरीष्ठ सूत्राने सांगितले. ‘मर्यादित षटकांच्या देशी स्पर्धा पूर्ण झाल्या असल्याने मार्चअखेरीस आयपीएल सुरू होईपर्यंत वरुण रिकामाच राहणार आहे. तो सध्या चांगल्या लयीमध्ये असून हा जोम त्याने कायम राखावा, असे व्यवस्थापनाला वाटते,’ असेही त्याने सांगितले.
इंग्लंडची वनडे मालिका व नंतरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची निवड होणार का, असे विचारता, ‘निवड समितीने वनडे मालिकेसाठी चार स्पिनर्सची याआधीच निवड केलेली आहे तर या मालिकेत केवळ तीनच सामना आहेत’ असे त्याने उत्तर दिले. मात्र संघव्यवस्थापनाला तो संघात हवा असेल तर निवड समिती अध्यक्षांशी त्यासंदर्भात निश्चितच चर्चा केली जाईल. पण संघात तो हवा आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,’ असे ते म्हणाले.
भारताकडे दुसरा मनगटी स्पिनर नसल्याने आणि वरुण फॉर्ममध्ये असल्याने निवडीसाठी त्याचा दावा बळकट असल्याचे मानले जात आहे. 2021 मधील टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुबईतील पाटा खेळपट्यांवर वरुणला संघर्ष करावा लागल्या वेशेष प्रभावा पाडता आला नव्हता. पण त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीत वैविध्या आणत बरीच सुधारणा केली असल्याने त्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.