वरुण चक्रवर्ती, त्रिशा गोंगाडीची शिफारस
वृत्तसंस्था / दुबई
जानेवारी, महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारतातर्फे वरुण चक्रवर्ती आणि त्रिशा गोंगाडी यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. इंग्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने या मालिकेत 5 सामन्यात 9.85 धावांच्या सरासरीने 14 गडी बाद केले आहेत. भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशा फरकाने एकतर्फी जिंकली. पुरुषांच्या विभागात भारतातर्फे वरुण चक्रवर्ती, विंडीजतर्फे जोमेल वेरीकेन तसेच पाकतर्फे नौमन अली यांच्यात चुरस आहे.
नौमन अलीने विंडीज विरुद्धच्या मालिकेत 16 गडी बाद केले आहेत. तर पाक विरुद्धच्या मालिकेत विंडीजच्या वेरीकेनने 19 बळी मिळविले आहेत. महिलांच्या विभागात भारतीय कनिष्ठ महिला संघातील सलामीची फलंदाज तसेच उपयुक्त गोलंदाज त्रिशा गोंगाडीचे नाव आघाडीवर आहे. भारताच्या 19 वर्षांखालील महिलांच्या युवा संघाने नुकत्याच आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद सलग दुसऱ्यांदा मिळविले. या मालिकेत त्रिशा गोंगाडीने फलंदाजीत 309 धावा जमविल्या आहेत. या मालिकेत तीने टी-20 प्रकारातील आपले पहिले शतक झळकविले. या मालिकेत तिने 4 गडी बाद केले आहेत. महिलांच्या विभागातील पुरस्काराकरिता भारताची त्रिशा गोंगाडी, ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी, विंडीजची करिश्मा रामहॅरेक यांच्यात चुरस राहिल.