Vari Pandharichi 2025: वारकऱ्यांनी दुमदुमली अवघी पंढरी, विठू माउलीच्या भेटीची आस..
लाखो लाख वारकऱ्यांमुळे पंढरपूर गजबजून गेले आहे
By : विवेक राऊत
नातेपुते : पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य अजि दिन सोनियाचा।। ज्या विठुरायाच्या ओढीने संतांच्या नामाचा गजर करत शेकडो मैलांची वाटचाल केली, त्या मायबाप विठ्ठलाच्या पंढरी नगरीत अखेर लाखो वारकरी सर्व संतांच्या पालख्यांसोबत दाखल झालेत. लाखो लाख वारकऱ्यांमुळे पंढरपूर गजबजून गेले आहे.
वाखरी मुक्कामाहून दुपारी संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्यावर वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता.
अवघे जेणे पाप नासे ते हे असे पंढरीसी ||
गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला ||
अवघी सुखाचीच राशी ||
पुंडलिकाशी वोळली हे ||
तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी ||
ज्यांच्या दर्शनासाठी गेली वीस दिवस केलेली पायी वारी, भजनाचा सुरू असलेला अखंड हलकल्लोळ, त्यात वारी आज पूर्णत्वास गेलेले समाधान, अशा उत्साही वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले संतांचे पालखी सोहळे आणि लाखो वैष्णव भुवैकुंठ पंढरीत विसावले.
आज आषाढ शुद्ध दशमी पायी वारीचा शेवटचा दिवस, आपल्या लाडक्या दैवतांच्या ओढीने निघालेले वैष्णव भुवैकुंठ पंढरीत विसावले. पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते आज पहाटे माउलींची पहाटपूजा झाली. सकाळपासून अनेक दिंड्यांचे नैवेद्य माउलींना अर्पण करण्यात येत होते. संतांना
पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण
इसबावी विठ्ठल मंदिर येथे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण ‘माउली माउली’ नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. माउलींची पालखी रथातून पंढरपूर येथील भाटे यांच्या रथात ठेवण्यात आली.
इसबावीच्या पुढे माउलींच्या पादुका श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात देण्यात आल्या. यावेळी हैबतराव बाबांचे वंशज आरफळकर आणि वासकर महाराज होते. यावेळी परंपरेप्रमाणे दिवट्या लावण्यात आल्या होत्या. समाज आरतीनंतर माउलींचा पालखी सोहळा मंदिरात विसावला.
घ्यायला भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांच्या पालख्या दिंडीसह वाखरी येथे सामोऱ्या आल्या. वाखरी येथून सर्वात पुढे नामदेव महाराज, मुक्ताबाई, सोपानकाका, निवृत्तीनाथ महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज असे पालखी सोहळे पंढरपुरात दाखल झाले. नगरपालिका आणि पंढरपूर संस्थानने पालख्यांचे स्वागत आणि पूजन करण्यात आले.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची रविवारी सकाळी नगर प्रदक्षिणा होणार आहे. माउलींच्या पादुकांचे एकादशीला नगर प्रदक्षिणेच्या वेळी चंद्रभागा स्नान होईल. काल्याच्या दिवशी चंद्रभागा स्नान, नंतर पांडुरंगाची भेट होऊन गोपाळपुरात काला होईल.
कालाकरून पालखी दुपारी चारनंतर परतीचा प्रवास सुरू करेल. आषाढ वद्य दशमीला पालखी आळंदीला पोहोचेल. आषाढ वद्य एकादशीला नगरप्रदक्षिणा होऊन वारीची सांगता होईल. त्यानंतर बारस सोडून वारकरी आपापल्या गावी परततील.