इनरव्हील क्लबकडून विविध सामाजिक उपक्रम
प्रांतपाल वैशाली लोखंडे यांच्या बेळगाव भेटीची फलश्रुती : अनेक उपक्रमांना चालना
बेळगाव : इनरव्हील क्लबच्या प्रांतपाल वैशाली लोखंडे यांनी इनरव्हील क्लब ऑफ बेळगावला नुकतीच भेट दिली. या निमित्ताने क्लबने विविध सामाजिक उपक्रम राबविले. शहापूर लायन्स डायलेसिस सेंटरला भेट देऊन 200 डायलेसिस रुग्णांवर मोफत उपचारासाठी 20 हजार रुपयांचा निधी दिला. एकल अभियानतर्फे चालविल्या जाणाऱ्या रामनगर येथील हॉस्पिटलला 25 हजार रुपयांचा निधी व एका गरजू दांपत्याला उदरनिर्वाहासाठी भाजीविक्री करण्याची गाडी देण्यात आली. क्लबने सावगाव येथील कलमेश्वर हायस्कूल दत्तक घेतले असून या शाळेचा पूर्णत: कायापालट क्लबने केला आहे. शिवाय शाळेला संगणक व अनेक पुस्तकेही दिली आहेत. वैशाली लोखंडे यांच्या हस्ते नूतन शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
सायंकाळी मेसॉनिक हॉल येथे आयोजित कार्यक्रमात प्रारंभी सुनीता पाटणकर रचित व अर्चना बेळगुंदी यांनी संगीतबद्ध केलेला पोवाडा अवंती नाडगौडा यांनी सादर केला. त्यांना संवादिनीवर योगेश रामदास व ढोलकीवर संतोष गुरव यांनी साथ केली. गाण्यासाठी राजश्री आठल्ये, बेला शिवलकर, मीलन मुतकेकर व तेजू दळवी यांनी साथ केली. क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिरोज व इनरव्हील क्लब यांच्यातर्फे ह्युमॅनिटी फाऊंडेशनला औषधे व गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. व्यासपीठावर शिरोजच्या अध्यक्षा रिया शाह व सचिव सानिका वागळे उपस्थित होत्या. क्लबच्या सचिव उर्मी शेरेगार यांनी क्लबचा अहवाल सादर केला. लीना शाह संपादित क्लब बुलेटिनचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी वैशाली लोखंडे म्हणाल्या, आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून क्लब सामाजिक ऋणाची परतफेड करत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. महिलांनी एकजुटीने काम केल्यास समाज परिवर्तनाला हातभार लागतो. त्यांनी क्लबच्या उपक्रमाबद्दल मंजिरी पाटील, उर्मी शेरेगार व सदस्यांचे अभिनंदन केले.