सौर ऊर्जा क्षेत्रातील विविध कौशल्ये आणि संधी
ऊर्जा क्षेत्रांतर्गत सौर ऊर्जा क्षेत्रात होणाऱ्या वेगवान प्रगतीचे विविध स्तरावर आणि विविध संदर्भात परिणाम होत आहेत. उर्जेची वाढती मागणी व त्याचवेळी ऊर्जा क्षेत्रात हरित उर्जेला पाठबळ आणि वाढता प्रचार यामुळे सौर ऊर्जा क्षेत्र प्रगत तंत्रज्ञान, वाढते कौशल्ये व संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. त्याचाच हा आढावा...
जागतिक स्तरावरील प्रमुख धोरणात्मक निर्णयानुसार भारताने 2070 पर्यंत संपूर्णपणे पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आपल्यापुढे ठेवले असून यामध्ये अर्थातच सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्राचे मोठे योगदान राहणार आहे. यासाठी विविध प्रकारे धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नांना शासनातर्फे विशेष चालना दिली जात आहे.
याच धोरणांचा एक प्रमुख भाग म्हणून मोदी सरकारने लागू करून अंमलबजावणी करण्यात आलेल्या उत्पादन प्रोत्साहन योजना या विशेष धोरणामध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित उपकरणे व सुटे भाग यांचा आवर्जून समावेश करण्यात आला असून त्याचे दूरगामी परिणाम आताच दिसू लागले आहेत.
वाढत्या रोजगार संधी- वर नमूद केल्याप्रमाणे हरित ऊर्जा उपक्रमांतर्गत केवळ पर्यावरणपूरक व आर्थिक दृष्ट्या सक्षमच नव्हे तर रोजगारपूरक ऊर्जा क्षेत्रासाठी परिणामकारक प्रयत्न केले जात आहेत. एका प्राथमिक अंदाजानुसार पवनऊर्जा क्षेत्रात सुमारे 40 लाख तर सौर ऊर्जा क्षेत्रात सुमारे 10 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. याशिवाय विद्युत वाहन उद्योगात प्रत्यक्ष दृष्ट्या 1 कोटी व अप्रत्यक्ष स्वरुपात 5 कोटी रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतील. यावरून ऊर्जा क्षेत्रातील सौर उर्जेच्या प्रवेशामुळे आगामी 10 वर्षात उपलब्ध होऊ घातलेल्या रोजगार संधींची कल्पना सहजगत्या येऊ शकते.
कौशल्य विकास :आव्हान आणि संधी- अशा प्रकारे सौर ऊर्जा क्षेत्राच्या विकासातून रोजगारांसह स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्या तरी त्यासाठी सौर ऊर्जा या नव्याने विकसित क्षेत्रासाठी आवश्यक अशा विविध स्तरांवरील कौशल्यांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत देशांतर्गत विद्यार्थी-युवकांपैकी केवळ 10 टक्के उमेदवारांना सौर ऊर्जा विषयातील औपचारिक प्रशिक्षण प्राप्त होते हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. या एकाच मुद्यावरून सौर ऊर्जा क्षेत्रातील कौशल्य विषयक प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट होते. हरित ऊर्जा विकासासह सौर ऊर्जा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या वाढत्या गरजा व या कौशल्य पात्रतेतील तफावत यावर परिणामकारक उपाययोजना म्हणून शासनातर्फे खालीलप्रमाणे प्रमुख उपक्रम प्राधान्यक्रमाने हाती घेतले आहेत.
स्किल काऊंसिल फॉर ग्रीन जॉब्ज - या योजनेतंर्गत सौर ऊर्जा तंत्रज्ञान व हाताळणी, उपकरणांची जुळणी व मांडणी, पवन ऊर्जा तंत्रज्ञान व माहिती व जैविक ऊर्जा तंत्रज्ञान यासारख्या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
ग्रीन स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम- या विशेष उपक्रमाद्वारे 60 लाख युवा उमेदवारांना हरित ऊर्जा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व विकास, वातावरणातील बदल आणि त्यांचे नियोजन, वन विकास व व्यवस्थापन व स्थायी विकासाला चालना देणे यासारख्या विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन करून हरित कौशल्य विकासाला चालना दिली जाते. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन- हरित ऊर्जा क्षेत्राला आवश्यक असणारी बाब म्हणून
नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनतर्फे राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व वापरासाठी हायड्रोजनचा अधिकाधिक वापर व प्रसार-प्रचार व्हावा यासाठी कार्यरत असते. विविध शैक्षणिक अभ्यासक्रम- हरित ऊर्जा क्षेत्राच्या नव्या गरजा व वाढती मागणी लक्षात घेऊन खालीलप्रमाणे शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
सौर ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा परिचय आणि सराव- 240 तासांच्या या सौर ऊर्जा कौशल्य परिचय व विकास या विशेष अभ्यासक्रमासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
टाकाऊ पदार्थांवरील प्रक्रिया - व्यवस्थापन-घन कचरा व जैविक कचऱ्यावरील प्रक्रिया व व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा, ई-कचरा, बांधकाम प्रक्रियेतील कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावरील 300 तासांच्या या विशेष अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी विज्ञान विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
कृषी व स्थायी विकास पद्धतीवरील अभ्यासक्रम- मधमाशा पालन व मध-संकलन, लाख उत्पादन व प्रक्रिया, रेशीम उत्पादन इ. कृषी क्षेत्राशी निगडित व स्थायी विकासाला पूरक ठरणाऱ्या विषयांवर आधारित 400 तासांच्या विशेष अभ्यासक्रमासाठी उमेदवार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत.
विशेष उत्पादनांची विक्री-व्यवस्थापन-बांबू, जंगली गवत, नारळाच्या करवंट्या इ. पासून बनविलेल्या उत्पादनांच्या विक्रीच्या माध्यमातून स्थायी विकासासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या 200 तासांच्या मार्गदर्शनपर अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वातावरणीय बदलांचे व्यवस्थापन- वातावरणात होणाऱ्या बदलांचे निदान व निराकरण करून त्याद्वारे स्थायी विकास साधण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या 105 तासांच्या या विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत.
वरील अभ्यासक्रमांशिवाय ‘ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ या विशेष प्रशिक्षण उपक्रमांद्वारे सौर उर्जेच्या माध्यमातून हरित ऊर्जा अभियानाद्वारे खालील विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते.
हरित व सौर ऊर्जा क्षेत्र- सौर ऊर्जा निर्मिती केंद्र निर्माण, सौर ऊर्जा उपकरण उत्पादन, सौर तंत्रज्ञान सहाय्यक, सौर ऊर्जा पारेषण, जमीन सर्वेक्षण व अहवाल, सौर संयंत्र देखभाल व दुरुस्ती.
पवन ऊर्जा-पवन ऊर्जा विषयक उपकरणांची निर्मिती देखभाल व दुरुस्ती.
जैविक इंधन- जैविक इंधन निर्मिती व जैविक वायू उत्पादन.
हरित व शाश्वत बांधकाम क्षेत्र-शाश्वत विकासाला पूरक अशा स्थापत्यशास्त्र व बांधकाम निर्मिती.
कचरा प्रक्रिया व पुर्नउपयोग-घन कचरा, नागरी कचरा, जैविक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, मल नि:सारणासह प्रक्रियायुक्त पाणी इ. वर प्रक्रिया करून त्याद्वारे पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प व्यवस्थापन.
याशिवाय सौर उर्जेसह पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीद्वारा शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील विषयतज्ञ व संशोधकांद्वारा विविध विषयातील प्रशिक्षण सल्ला, मार्गदर्शन, नवागत वा नव्याने शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना सौर ऊर्जा विषयातील उमेदवारी प्रशिक्षण, विविध स्तरांवर प्रत्यक्ष कामाचा सराव इ. विविध प्रकारे सौर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित शिक्षण प्रशिक्षण व कौशल्य विकासाला चालना देणारे नवे उपक्रम नव्या पिढीसाठी लाभदायी ठरणारे आहेत.
दत्तात्रय आंबुलकर