पश्चिम भागातील विविध मंदिरांमध्ये आज-उद्या विविध कार्यक्रम
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील अनेक गावांतून महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन, कीर्तन, अभिषेक, महापूजा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक गावातील मंदिरातून बुधवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच अभिषेक, पुजा आणि 27 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
उचगाव 
उचगाव-गोजगे मार्गावरील उचगावनजीक असलेल्या रामलिंग मंदिरामध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून पूजा, अर्चा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे मंदिरामध्ये किरणोत्सव प्रसंगी शिवमूर्तीवर अभिषेक, पूजा, महाआरती आणि तीर्थप्रसाद रामलिंग सेवा अभिवृद्धी संघामार्फत करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजन कार्यक्रम होणार आहे. गुऊवार दी.27 रोजी सकाळी पहाटे महाआरती, पूजा, तीर्थप्रसाद होईल आणि सकाळी ठीक 8 ते 12 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे रामलिंग सेवा अभिवृद्धी संघामार्फत कळविण्यात येत आहे.
मंदिराचा जीर्णोद्धाराचा संकल्प
रामलिंग तलावानजीक असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प रामलिंग देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांतर्फे केला आहे. ज्या भाविकांना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी द्यायची असेल त्यांनी मंडळाशी संपर्क साधून देणगी द्यावी, असेही कळविले आहे.
गोजगे
गोजगे येथील महाकलमेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री उत्सवानिमित्त शिवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी पहाटेपासून अनेक भाविकांच्या उपस्थितीत शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, महाआरती करून भाविकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. बुधवारी रात्री प्रवचन, भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी एक ते चार या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गोजगे आणि परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे शिवरात्र उत्सव मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
तुरमुरी
तुरमुरी येथील शिवमंदिरामध्ये भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, आरती आणि तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. सुळगा(हिं.)येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्ये शिवरात्रीचे औचित्य साधून अभिषेक, पूजा महाआरती आणि तीर्थप्रसाद करण्यात येणार आहे. तसेच बेनकनहळ्ळी येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्येही अभिषेक, पूजा महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. कल्लेहोळ येथील कलमेश्वर मंदिरामध्येही बुधवारी पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.