For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गांधी भारत’निमित्त 21 रोजी बेळगावात विविध कार्यक्रम

06:36 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘गांधी भारत’निमित्त 21 रोजी बेळगावात विविध कार्यक्रम
Advertisement

सुवर्णसौध आवारात महात्मा गांधी पुतळ्याचे होणार अनावरण , ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळाव्याचेही आयोजन

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे लांबणीवर पडलेल्या ‘गांधी भारत’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 21 जानेवारी रोजी बेळगावमधील सुवर्णसौध आवारात महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली.

Advertisement

बेंगळूरमधील काँग्रेस कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगावमधील काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गांधी भारत कार्यक्रमाला प्रारंभ केला आहे. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे झाल्यानिमित्त 26 डिसेंबर 2024 रोजी बेळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची सभा घेण्यात आली होती. त्या दिवशी सायंकाळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मुख्य सचिवांनी चर्चा करून 21 जानेवारी रोजी कार्यक्रम आयोजिण्याचा निर्णय घेतला आहे. 1924 च्या काँग्रेस अधिवेशनासंबंधी माहिती पुस्तिका व इतर पुस्तकांचेही प्रकाशन 21 रोजी करण्यात येईल. त्या दिवशी सकाळी बेळगावच्या सुवर्णसौध आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण होईल. या कार्यक्रमाला सर्व पक्षातील आमदारांना निमंत्रण देण्यात येईल. त्या दिवशी दुपारी 12 वाजता ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ नावाने राष्ट्रीय काँग्रेसचा मेळावा आयोजिण्यात आला आहे. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघांतून किमान 100 काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. यात सहभागी होणाऱ्य नेत्यांविषयी काही दिवसांत कळविण्यात येईल, असेही शिवकुमार यांनी सांगितले.

13 जानेवारीला पक्षाची बैठक

सदर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, ब्लॉक आणि जिल्हा अध्यक्ष, आमदार, विविध युनिटचे अध्यक्ष, माजी मंत्री, माजी आमदार सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक होणार आहे. सायंकाळी 4 वा. केपीसीसीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. नंतर मुख्यमंत्री पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक घेणार आहेत.

15 व 16 जानेवारी रोजी सर्व आमदार, पराभूत उमेदवारांनी आपापले नियोजित कार्यक्रम रद्द करून मतदारसंघांमध्ये पक्षसंघटनेसाठी पूर्वसिद्धता बैठक घ्यावी. या बैठकांमध्ये सर्व पदाधिकारी, प्रभारी व निरीक्षक सहभागी होणार आहेत. कित्तूर कर्नाटक भागातील मंत्री, आमदार, विधानपरिषद सदस्य, विविध समित्यांमधील समस्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशी हाकही शिवकुमार यांनी दिली.

पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, मंत्री डॉ. जी. परमेश्वर, के. एच. मुनियप्पा, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार नेलमंगल श्रीनिवास, विधानपरिषद सदस्य एस. रवी आदी नेते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.