विसर्जन मिरवणुकीत विविध संदेशानी लक्ष वेधले
बेळगाव : ‘चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि नडत असेल तर त्याला महिषासूरमर्दिनीचे रुप दाखवा’ या व अशा अनेक संदेशानी विसर्जन मिरवणुकीमध्ये लक्ष वेधून घेतले. अलीकडेच देशात महिला अत्याचाराच्या अत्यंत गंभीर अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे देशभरात त्याचे पडसाद उमटले. बेळगाव त्याला अपवाद नाही. विविध गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मंडळाच्या देखाव्यांमध्ये या प्रश्नांचे लक्ष वेधले.तर गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल पथकांनीसुद्धा या अत्याचाराबद्दल आवाज उठवत आपल्या संवेदना स्पष्ट केल्या.
बहुसंख्य तरुणींचा सहभाग असलेल्या मारुती गल्ली येथील वज्रनाद ढोल पथकाने ढोलांवर महिला अन्यायांविरुद्ध आवाज उठविणारे विविध संदेश लिहिले होते. ‘तुम्हाला जर वाटत असेल राजे पुन्हा जन्माला यावेत तर आधी प्रत्येक जिजाऊंचा सन्मान करा, ‘आई बहिणीची छेड काढेपर्यंत वाट बघू नका, नजर टाकताच हरामखोराची गर्दन मारून टाका’, ‘नेहमी मुलींना बोलले जाते आपल्या घराची इज्जत घालवू नकोस, परंतु त्यापेक्षा मुलांनाच बोला, की कधी कोणाच्या घराच्या इज्जतीशी खेळू नका’, अशा आशयाचे संदेश लक्षवेधी ठरले.