प. पु प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात
ओटवणे समाधी मंदिरात विविध कार्यक्रम
ओटवणे प्रतिनिधी
आयुर्वेद आणि अध्यात्मिक प्रवचनाच्या माध्यमातून हजारो भक्तगणांना सद्दमार्ग दाखवणाऱ्या परमपुज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराजांचा १० व्या पुण्यतिथी सोहळ्याला शुक्रवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त असंख्य भाविकांनी कुडाळकर महाराज चरणी लिन होतं महाराजांचा कृपाशीर्वाद घेतला. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त कुडाळकर महाराजांच्या समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यतिथी उत्सवाला समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरतीने प्रारंभ झाला. सकाळी सर्व देवतांचे पूजन त्यानंतर प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेकाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळ (पुणे), ह भ प अशोक महाराज गुरव आणि श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे यांचे सुश्राव्य भजननाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दुपारी महाआरती आटोपल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या उत्सवासाठी गाणगापूर येथील निर्गुण दत्तपादुका आणण्यात आल्या होत्या या पादुकांचेही भाविकांनी दर्शन घेतले. सायंकाळी पारंपारिक वारकरी हरिपाठ, पारंपारिक पंचपदी नामस्मरण, नामसंकीर्तन आदी कार्यक्रम झाले.