कल्लेहोळ येथे विविध विकासकामांना,प्रलंबित रस्ताकामाला सुरुवात
शेतकरी-ग्रामस्थांत समाधान : गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रस्ताकामाकडे झाले होते दुर्लक्ष
वार्ताहर/उचगाव
कल्लेहोळ येथे विविध विकास कामांना व रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लक्ष्मी गल्ली, जनता कॉलनी, मराठी शाळेतपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हा रस्ता गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून करण्यात यावा, अशी कल्लेहोळ गावातील नागरिकांची मागणी होती. परंतु अनेक वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले होते. शेतीवाडीमध्ये तसेच प्राथमिक शाळा व हायस्कूलकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आलेले होते. त्यामुळे सध्याचे सुळगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष रमेश खन्नुकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न करून दहा लाख रुपये निधी ग्रामपंचायतमधून मंजूर करून घेतलेला आहे. व या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हा रस्ता करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली मोठमोठी झाडे तसेच इलेक्ट्रिक खांब बाजूला करून हा रस्ता करण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना शेतीकडे येण्या जाण्यासाठी मोठी सोय होणार आहे. हा रस्ता खडीकरण करून सिमेंटीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत रस्त्यामध्ये येणारे अडथळे दूर करून ठिकठिकाणी कायमस्वरूपी गटारावरती काँक्रीट घालून सर्वांना ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या कामाला सुऊवात करण्यात आलेली आहे. हा रस्ता चांगला व्हावा यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश खन्नुकर हे जातीने लक्ष घालून हा रस्ता करून घेत आहेत. जवळजवळ अर्धा किलोमीटर हा रस्ता करण्यात येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारीची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. हा रस्ता पक्का झाल्यानंतर त्याचा सर्वांना फार मोठा उपयोग होणार आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कॉन्टॅक्टर पाटील हे जातीने लक्ष घालत आहेत. या रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी फार मोठी सोय होणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे कल्लेहोळ नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरलेले आहे.
जातीनिशी लक्ष घालून रस्ताकाम करून घेऊ!
गेल्या 30 ते 35 वर्षापासून जनता कॉलनी, लक्ष्मी गल्ली येथील रस्ता करण्यात यावा, अशी मागणी त्या भागातील शेतकरी व नागरिकांनी केली होती. परंतु अद्याप कुठल्याही सदस्याने त्यांच्याकडे लक्ष दिलेले नव्हते. मी स्वत: ग्रामपंचायत अध्यक्ष झाल्यानंतर जातीने लक्ष घालून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. या रस्त्यामुळे गावातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हा रस्ता चांगला करून घेण्यासाठी मी जातीने लक्ष घालत आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून घेऊ.
- रमेश खन्नुकर,ग्रा. पं. अध्यक्ष सुळगा