विविध केंद्रीय मंत्रालये आता एकाच छताखाली
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘कर्तव्य भवन-3’चे उद्घाटन : गृह, परराष्ट्र मंत्रालयासह सात मंत्रालयांची कार्यालये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील कर्तव्य पथावरील ‘कर्तव्य भवन-3’ इमारतीचे उद्घाटन केले. ही इमारत 2019 मध्ये सुरू झालेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग असून कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट (सीएसएस) म्हणजेच सामान्य केंद्रीय सचिवालयाच्या 10 इमारतींपैकी पहिला टप्पा आहे. येथे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, एमएसएमई मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) आणि गुप्तचर विभागाची कार्यालये असतील.
‘कर्तव्य भवन-3’मध्ये दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या विविध मंत्रालये आणि विभागांना एकत्र आणून त्यांच्यातील काम अधिक चांगले समन्वय साधण्यासाठी आणि वेगवान करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. त्यात तळमजल्यासह 7 मजले आहेत. दिल्लीतील वेगवेगळ्या इमारतींमध्ये विखुरलेले केंद्र सरकारचे सर्व मंत्रालय आता एकाच इमारतीतून चालतील. कर्तव्य पथाच्या दोन्ही बाजूला ‘कर्तव्य भवन’ बांधण्यात आले आहे. सकाळी झालेल्या मुख्य उद्घाटन कार्यक्रमानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधानांनी कर्तव्य पथावर एका जाहीर सभेला संबोधित केले.
सरकारच्या म्हणण्यानुसार, अनेक मंत्रालये सध्या 1950 ते 1970 च्या दशकात बांधलेल्या शास्त्राr भवन, कृषी भवन, उद्योग भवन आणि निर्माण भवन यासारख्या जुन्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत, ज्या आता संरचनात्मकदृष्ट्या जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारतीची बांधणी करण्यात आली आहे. आता या नव्या इमारतीत मंत्र्यांना स्वतंत्र दालन मिळणार आहे. ‘कर्तव्य भवन’ 1.5 लाख वर्ग मीटरमध्ये पसरलेले आहे. या इमारतींमध्ये 24 कॉन्फरन्स रूम देखील आहेत. प्रत्येक खोलीत 45 लोक बसू शकतात. येथे एकाचवेळी 600 कार पार्क करता येतात. यामध्ये एक पाळणाघर, योगा कक्ष, वैद्यकीय कक्ष, कॅफे, स्वयंपाकघर आणि हॉलही आहे.
अत्याधुनिक साज
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत, केंद्रीय मंत्रालये आणि विभागांसाठी अशा 10 इमारती बांधल्या जाणार आहेत. आतापर्यंत त्यापैकी 3 बांधण्यात आल्या आहेत. ‘कर्तव्य भवन-3’ हे एक आधुनिक कार्यालय संकुल आहे. येथे योगा, पाळणाघर, वैद्यकीय कक्ष, कॅफे, बहुउद्देशीय हॉलदेखील आहेत. तसेच इमारतीमध्ये एकूण 27 लिफ्टही बसविण्यात आल्या आहेत. 27 सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनर आहेत. तसेच 2 स्वयंचलित जिने देखील आहेत. संपूर्ण इमारतीवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन इमारतींमध्ये एक कमांड सीसीटीव्ही सेंटर देखील बांधण्यात आले आहे, जिथून परिसर आणि आतील कॉरिडॉरवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत, कृषी भवन, उद्योग भवन, शास्त्राr भवन आणि निर्माण भवन लवकरच पूर्णत्वास जातील. त्यामध्ये असलेल्या सर्व मंत्रालयांना रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन कर्तव्य इमारती बांधताच ही सर्व मंत्रालये आणि विभाग त्यांच्याकडे स्थलांतरित केले जातील असे मानले जाते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ‘सीसीएस’च्या 10 इमारती बांधण्याची योजना आखली आहे. संपूर्ण प्रकल्प जून 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण इमारतीत सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत. 5.34 लाख सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत, 50-60 वर्षे जुन्या इमारती बदलण्यात येत आहेत.