Vari Pandharichi 2025: ज्ञानोबा-तुकोबा नामाचा गजर, बेलवाडीत रंगला तुकोबांचा पालखी रिंगण सोहळा
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा शुक्रवारी सणसरमध्ये मुक्काम होता
पुणे : टाळ-मृदंगाचा नाद आणि ज्ञानोबा-तुकोबा नामाचा गजर... अशा वातावरणात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. त्यानंतर पालखी निमगाव केतकी मुक्कामी दाखल झाली. भावभक्तीचा नाद आणि ग्रामस्थांकडून झालेले पालखीचे हृद्य स्वागत यामुळे पंचक्रोशीतील अवघे वातावरण विठ्ठलमय झाले.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा शुक्रवारी सणसरमध्ये मुक्काम होता. सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सणसरकरांनी पालखीला जड अंत:करणाने निरोप दिला. पंढरीच्या मार्गावर पालखी येताच वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. टाळ घणघणले. मृदंगाचा नाद जडू लागला. त्याला सोबत लाभली, ती तुकोबारायांच्या अभंगांची.
या अभंगांमधून विठ्ठलभक्तीचा नाद घुमला. त्याने सारा आसमंत व्यापून गेला. अशा विठ्ठलमय वातावरणातच सोहळा पुढे जाऊ लागला. या साऱ्याला निसर्गाची साथसंगतही लाभली. त्यामुळे सोहळा अधिकच आनंदमय होऊन गेला. सोहळा बेलवाडीत येताच दिंड्यादिंड्यातील वारकरी एकवटले. रिंगण सोहळ्यासाठी सर्व सज्ज झाले.
भगव्या पताकाधारी वारकरी, तुळशी वृंदावर डोईवर घेतलेल्या महिला, विणेकऱ्यांनी सुरुवातीला पालखीभोवती प्रदक्षिणा घातली. त्यानंतर मानाच्या अश्वांचे आगमन झाले. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले. मानाचे अश्व दौडू लागताच वारकऱ्यांचा उत्साह दुणावला.
अश्वांनी पालखीला तीन प्रदक्षिणा घालत पालखीचे दर्शन घेतले. त्यांची चरणधूळ मस्तकी लावण्यासाठी वारकरी, भाविकांमध्ये झुंबड उडाली. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा बेलवाडीवासियांनी आपल्या डोळ्यात साठवला. त्यानंतर तुकोबांची पालखी निमगाव केतकीच्या दिशेने निघाली.
तुकोबांच्या भेटीने अवघा गाव गेला मोहरून
नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात पालखीचे आगमन होताच गावकऱ्यांनी हर्षोल्हासात पालखीचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तुकोबांच्या भेटीने अवघा गाव मोहरून गेला. दरवर्षी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते.
स्वच्छता मोहीम, निर्मलवारीअंतर्गत शौचालयांची व्यवस्था केली जाते. यंदाही वारकऱ्यांकरिता सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. गावकऱ्यांकडून मोठ्या भक्तिभावात सोहळ्याचे आदरातिथ्य करण्यात आले. रविवारी पालखी इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.