वरेण्य ज्ञानचक्षुनी महाअद्भुत विश्वरूप पाहू लागला
अध्याय आठवा
ऋषीमुनी हे ज्ञानी असतात आणि त्यांना स्वत:ला असलेल्या ज्ञानाचे फार महत्त्व वाटत असते. तसेच देवादीकांना आपण फार पुण्यकर्मे केली असल्याने आपल्याला देवत्व प्राप्त झालेले आहे असे वाटत असते. स्वत:च्या महात्म्यापुढे इतर गोष्टी त्यांना गौण वाटतात. म्हणून ऋषीमुनी, देव यांना विश्वरूप पाहण्याची इच्छा असतेच असे नाही पण भक्ताची गोष्टच वेगळी असते, तो स्वत:ला विसरून ईश्वराला समर्पित झालेला असतो. अनन्यतेमुळे त्याला ईश्वराच्यापुढे अन्य काही दिसतच नसते आणि म्हणूनच त्याच्यासाठी ईश्वर काहीही करायला तयार असतात. त्यानं न मागताही ईश्वर त्याची गरज ओळखून त्याच्यासाठी ती गोष्ट हजर करतात. वरेण्य राजा बाप्पांचा अनन्य भक्त होता म्हणून त्याने इच्छा केल्याप्रमाणे त्याला आपलं दिव्य, अलौकिक असं विश्वरूप पहायला मिळावं म्हणून बाप्पांनी त्याला ज्ञानचक्षु प्रदान केले. ज्ञानचक्षुनी वरेण्य राजा आता महाअद्भुत असे विश्वरूप पाहू लागला.
व्यास मुनींनी ततो राजा वरेण्य? स दिव्यचक्षुरवैक्षत । ईशितुऽ परमं रूपं गजास्यस्य महाद्भुतम् ।। 5।। ह्या सध्या आपण अभ्यासत असलेल्या श्लोकात सांगितल्यानुसार दिव्य चक्षु प्राप्त झालेला वरेण्यराजा परमेश्वर गजाननाचे अत्यंत अद्भुत असे श्रेष्ठ रूप पाहू लागला.
पुढील श्लोकातून मुनी विश्वरूपाचे वर्णन करत आहेत.
असंख्यवत्रं ललितमसंख्यांघ्रिकरं महत् ।
अनुलिप्तं सुगन्धेन दिव्यभूषाम्बरस्रजम् ।। 6 ।।
असंख्यनयनं कोटिसूर्यरश्मिधृतायुधम् ।
तद्वर्ष्मणि त्रयो लोका दृष्टास्तेन पृथग्विधाऽ।। 7।।
अर्थ-असंख्य मुखांनी युक्त, असंख्य पाय व हात असलेले, प्रचंड, सुगंधाने लिप्त, दिव्य अलंकार-वस्त्रs व माला धारण केलेले, असंख्य नेत्र असलेले, कोटीसूर्याप्रमाणे तेज असलेले, अनेक आयुधे धारण केलेले असे ते सूंदर रूप होते. त्याच्या शरीरामध्ये त्याने नानाप्रकारची त्रिभुवने पाहिली.
विवरण- एका बीजपासून अनेक वृक्ष निर्माण होतात, त्याप्रमाणे विश्वाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे त्याला एकातून अनेकत्व दाखवणारी असंख्य मुखे आहेत. तसेच हात आणि पायही आहेत. ईश्वराची नामरूप, जीवनरुप, आनंद रूप आणि निर्मोहरूप अशी चार प्रकारची सत्ता मानली गेली आहे. त्यापैकी नामरूप सत्ता देवीची असते तर जीवनरुप सत्ता सूर्याची असते. आनंद रूप सत्ता विष्णूची असून निर्मोहरूप सत्ता शिवाची असते. विश्वरूपात या चारही सत्ता एकवटलेल्या असतात. चारांचाही साक्षात्कार ज्याला झालेला आहे त्यालाच हे विश्वरूप दर्शन शक्य होते. वरेण्य राजा ही सर्व क्षमता बाळगून असल्याने विश्वरूप दर्शन घेत आहे. आपले भाग्य असे की, त्याचे समग्र वर्णन तो आपल्याला पुढील श्लोकापासून सांगणार आहे.
दृष्ट्वैश्वरं परं रूपं प्रणम्य स नृपोऽब्रवीत् ।
वरेण्य उवाच -
वीक्षेऽहं तव देहेऽस्मिन्देवानृषिगणान्पितऽन्।।8।।
पातालानां समुद्राणां द्वीपानां चैव भूभृताम् ।
महर्षीणां सप्तकं च नानार्थैऽ संकुलं विभो ।। 9 ।।
अर्थ-ईश्वराचे ते श्रेष्ठ रूप पाहून, राजा नमस्कार करून म्हणाला, तुझ्या या देहामध्ये देव, ऋषिगण व पितर मी पहात आहे. पाताळे, समुद्र, द्वीपे, राजे, महर्षि यांची सप्तके पहात आहे. हे विभू, तुझ्या रुपात नानाप्रकारचे पदार्थ आहे.
भुवोऽन्तरिक्षस्वर्गांश्च मनुष्योरगराक्षसान् ।
ब्रह्माविष्णुमहेशेन्द्रान्देवान्जन्तूननेकधा ।। 10 ।।
अर्थ-पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, मनुष्य, नाग, राक्षस, ब्रह्मदेव, विष्णु, महेश, इंद्र, नानाप्रकारचे देव व प्राणी तुझ्या शरीरामध्ये मी पहात आहे.
क्रमश: