Pune Monsoon update ३१ ऑगस्टपर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे, दि. ६ : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरडी कोसळून अपघात होण्याचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडीवरील राजेवाडी-वरंधा-भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट रस्ता ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
आदेशानुसार, वरंधा घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव–निजामपूर–ताम्हिणी घाट–मुळशी–पिरंगुट–पुणे हा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजेवाडी फाटा–पोलादपूर–महाबळेश्वर–वाई–सुरूर–सातारा–कराड–कोल्हापूर किंवा राजेवाडी फाटा–पोलादपूर–खेड–चिपळूण–पाटण–कराड–कोल्हापूर या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी बंदी आदेशाचे पालन करून अनावश्यकपणे वरंधा घाट मार्गाचा वापर टाळावा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.