कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘वंदे मातरम्’

06:30 AM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा महामंत्र असलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानावर संसदेत वादळी चर्चा झाली आहे. स्वातंत्र्यानंतर या गीताला ‘राष्ट्रगान’ हा सन्मान देण्यात आला. हे गीत आठ कडव्यांचे आहे. तथापि, त्याची पहिली दोनच कडवी राष्ट्रगान म्हणून गायली जातात. नंतरची सहा कडवी नेमकी काय आहेत हे कित्येकांना माहितही नाही. ही उर्वरित कडवी का वगळली, या प्रश्नावर त्या काळातही मोठी चर्चा आणि वाद झालेले आहेत. संसदेतील चर्चेत या गीताच्या महतीसमवेत या वादाचीही उजळणी होणे स्वाभाविक होते. तसेच झाले. हा वाद नेमका काय आहे, हे समजण्यासाठी या गीताची पार्श्वभूमी आणि कालानुक्रम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हे गीत थोर बंगाली लेखक आणि कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये रचले. त्यानंतर सात वर्षांनी 1882 मध्ये त्यांनीच ‘आनंदमठ’ नामक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीत या गीताचा समावेश केला. ही कादंबरी प्रचंड गाजली. ‘वंदे मातरम्’ हे गीतही ब्रिटीशांच्या परकीय सत्तेविरोधातील क्रांतीकारक संघर्षाचा प्रेरणामंत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध झाले. अनेक क्रांतीकारक या मंत्राचा घोष करीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. 1896 मध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन कलकत्ता (सध्याचे कोलकाता) येथे झाले होते. त्या अधिवेशनात कविवर्य रविंद्रनाथ टागोर यांनी हे पूर्ण गीत गायले, अशी माहिती उपलब्ध आहे. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष एम. रहिमतुल्ला सयानी हे होते. त्यांच्या उपस्थितीतच हे गीत गायले गेले. तथापि, त्यावेळी या पूर्ण गीताला कोणीही कोणताही आक्षेप घेतला नव्हता. पुढे 1905 मध्ये काँग्रेसने या गीताचा स्वीकार केला. तेव्हाही कोणती वादावादी झाली नव्हती. त्यानंतर 1937 च्या आसपास मोहम्मद अली जीना आणि त्यांचा मुस्लीम लीग हा पक्ष यांनी या गीताला ते इस्लाम धर्माच्या विरोधात आहे, असा कांगावा करुन प्रचंड विरोध केला. काँग्रेसने ‘सर्वसमावेकत्वा’चे कारण पुढे करत आणि मुस्लीमांच्या भावना दुखावू नयेत म्हणून या गीताची पाहिली दोन कडवीच स्वीकारण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या कार्यकारी समितीने ऑक्टोबर 1937 मध्ये या गीतासंदर्भात एक प्रस्ताव संमत केला. ‘या गीताची पहिली दोन कडवी सर्वसामान्य स्वरुपाची असून त्यांच्यातून कोणतीही धर्मभावना प्रखरपणे उमटत नाही. त्यामुळे हीच दोन कडवी काँग्रेसचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आली आहेत. इतर पुढची कडवी बिगर हिंदू लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांकरिता वगळण्यात आली आहेत’ असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानंतरच हा वाद निर्माण झाला असून, जेव्हा या गीताचा संदर्भ येतो, त्याच्यासह हा वादही पुढे येतो. कोणत्याही वादाप्रमाणे याच्याही दोन बाजू आहेत. काँग्रेसच्या किंवा सर्वसाधारणपणे जे स्वत:ला ‘धर्मनिरपेक्ष’ मानतात, त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय विविध समाजघटकांमधील एकता टिकवून धरण्यासाठी आणि सर्वसमावेषकत्व जपण्यासाठी घेतला गेला आहे. तर या संपूर्ण गीताच्या समर्थकांचे म्हणणे असे आहे, की ही अल्पसंख्याकांसमोर किंवा विशेषत: मुस्लीमांसमोर पत्करलेली ‘शरणागती’ आहे. कारण अशा प्रकारे तडजोड करुन सर्वसामावेशकत्व किंवा एकता या दोन्ही बाबी जपता येत नाहीत. 1937 मध्ये जो प्रस्ताव संमत करण्यात आला, त्यातही या गीताची उरलेली कडवी वगळण्याचे कारण हिंदूधर्मिय वगळता अन्यधर्मियांच्या भावना दुखवू नयेत, हेच केवळ देण्यात आले आहे. पुढे जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली, तेव्हा धर्माच्या आधारावरच देशाची फाळणी करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे. ही फाळणीही शांततामय पद्धतीने झाली नाही. लक्षावधी निरपराध्यांची क्रूर हिंसा त्या कालावधीत झालीच. महिलांवरील अत्याचारांचे तर वर्णन करता येणेही अशक्य आहे, असे त्या काळात प्रसिद्ध झालेली वृत्ते आणि ग्रंथ यांच्यावरुन दिसून येते. याचाच अर्थ असा, की ‘सर्वसमावेशकत्वा’साठी आणि सामाजिक एकतेसाठी ‘वंदे मातरम्’चे ‘संक्षिप्तीकरण’ (सामान्यांच्या भाषेत काटछाट) करुनही या घटना टाळता आल्या नाहीतच. त्यामुळे या गीताची पहिली दोनच कडवी स्वीकारण्यामागे जो उदात्त उद्देश असल्याचे सांगण्यात येत होते, तो उद्देश पूर्णपणे फसला, हे पुढच्या घटनांवरुन स्पष्ट होते. म्हणजेच, केवळ आपण कोणत्यातरी स्वप्नाळू तत्वासाठी त्याग करणे किंवा सर्वसमावेशकत्वाचा स्वीकार करणे, एवढेच पुरेसे नसते. ज्यांच्यासाठी हे करायचे असते, त्यांचा प्रतिसादही तसाच असावा लागतो. अन्यथा  शेवटी शोकांतिका आपलीच होते, हे यावरुन स्पष्ट होते. तसेच असे एकतर्फी त्याग किंवा चांगुलपणे आपल्याच अंगावर शेकण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा, भविष्यकाळात तरी या घटनांवरुन सावध आणि शाहणे होण्याची आवश्यकता आहे. आणखी एक मुद्दा असा, की ‘वंदे मातरम्’ या गीतामुळे कोणाच्या भावना दुखावतील, अशी जर तीव्र चिंता होती, तर स्वातंत्र्य संग्रामासाठी अन्य गाणे किंवा घोषणेचा (जे गाणे किंवा घोषणा पूर्णपणे स्वीकारली तरी कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत) स्वीकार करता येणे अशक्य होते काय? अन्य थोर व्यक्तीने रचलेले गीत ‘संक्षिप्त’ करुन स्वीकारुन वाद निर्माण करण्यापेक्षा, आधी सर्वांशी चर्चा करुन सर्वांना मान्य होईल, अशी घोषणा किंवा गीत स्वीकारणे त्याकाळी शक्य होतेच ना. तसे केले असते, तरी पुढच्या घटना टाळता आल्या नसत्या. पण निदान ‘वंदे मातरम्’चे ‘संक्षिप्तीकरण’ केल्यामुळे जो वाद त्या काळात निर्माण झाला आणि जो आजपर्यंत टिकून आहे, तो तरी टाळता आला असता. त्याकाळचे आपले नेते हे भविष्यकाळाचा वेध घेऊ शकणारे ‘द्रष्टे’ होते, अशी त्यांची प्रशंसा केली जाते. पण ‘राष्ट्रगाना’सारखा संवेदनशील विषय अशा प्रकारे हाताळल्यास काय होऊ शकते, हे अशा नेत्यांच्या लक्षातही येऊ नये, हे अनाकलनीय आहे. असो. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानासंबंधीच्या वादाने आपल्याला एक धडा मात्र निश्चितच शिकविला आहे. कोणत्याही उद्देशाने आक्रमकतेसमोर मान झुकवून आपला उद्देश साध्य होत नाही, हाच तो महत्त्वाचा धडा आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article