For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वातंत्र्यदिनी धावणारी 'वंदे भारत' ५८ दिवस आधीच फुल्ल!

12:17 PM Jun 18, 2025 IST | Radhika Patil
स्वातंत्र्यदिनी धावणारी  वंदे भारत  ५८ दिवस आधीच फुल्ल
Advertisement

 खेड / राजू चव्हाण :

Advertisement

गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी धावणारी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ५८ दिवस आधीच हाऊसफुल्ल झाली आहे. 'रिग्रेट'चा शेरा मिळत असल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. सर्वच फेऱ्यांना उदंड प्रतिसाद असल्यामुळे एक्स्प्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस २८ जून २०२३ पासून कोकण मार्गावर धावू लागल्यापासून पहिल्याच फेरीपासून एक्स्प्रेसच्या आजवर धावलेल्या फेऱ्या हाऊसफुल्ल धावल्या आहेत. गणेशोत्सव, दीपावली सुट्टीच्या हंगामासह शिमगोत्सवातील सर्वच फेऱ्यांचे आरक्षण खुले होताच हाऊसफुल्ल झाले होते.

Advertisement

एकीकडे वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना उदंड प्रतिसाद लाभत असतानाही केवळ ८ डब्यांच्या धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमुळे सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची संधी हुकत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे. याचमुळे एक्स्प्रेसला आणखी ८ डबे जोडण्याचा आग्रह गेल्या दीड वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

पावसाळ्यात तीन दिवस धावणारी एक्स्प्रेस ६ दिवस चालवण्याची मागणी कोकण विकास समितीसह अखंड कोकण प्रवासी सेवा समितीने कोकण बोर्डाकडे केली होती. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट एक्स्प्रेसला अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे कारण देत वाढीव फेऱ्या वाढवण्यास रेल्वे प्रशासनाने नकारघंटा वाजवली आहे. वाढीव फेऱ्यांच्या मागणीला कोकण विकास समितीसह अखंड कोकण प्रवासी सेवा समितीचा रेटा सुरुच आहे.

स्वातंत्र्यदिनासह १६ ऑगस्ट रोजीही गोपाळकाला आणि १७ रोजी रविवार सुट्टीचा दिवस आहे. या सलग सुट्ट्यांचा पर्यटकांनी पुरेपूर फायदा उठवला आहे. याचमुळे १५ ऑगस्ट रोजी मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ५८ दिवस आधीच फुल्ल झाली आहे.

Advertisement
Tags :

.