वंदे भारत रेल्वेचे बेळगावमध्ये जल्लोषात स्वागत
फुलांच्या वर्षावासह मिठाईचेही वाटप : प्रवाशांची तुडुंब गर्दी
बेळगाव : बहुचर्चित बेंगळूर-बेळगाव वंदे भारत रेल्वेचे रविवारी बेळगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी बेळगाव रेल्वेस्थानक प्रवाशांनी तुडुंब भरले होते. खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या उपस्थितीत वंदे भारतचे स्वागत झाले. केशरी रंगातील अत्याधुनिक सुविधा असलेली वंदे भारत बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाल्याने मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी बेंगळूर रेल्वेस्थानकातून बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. अवघ्या साडेआठ तासात बेंगळूरहून बेळगाव असा वेगवान व आलीशान प्रवास करता येणार आहे. सोमवारपासून वंदे भारत नियमित वेळेनुसार धावणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वंदे भारतच्या स्वागतासाठी बेळगाव रेल्वेस्थानक फुलांनी सजविले होते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वंदे भारत बेळगावमध्ये आल्याने नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला. फुलांचा वर्षाव करत रेल्वेचे स्वागत करण्यात आले. खासदार इराण्णा कडाडी म्हणाले, अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर बेळगावला वंदे भारत रेल्वे मिळाली. परंतु, प्रवाशांच्या मागणीनुसार या रेल्वेचे वेळापत्रक बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रात्री धावणारी बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस चिक्कजाजूर येथे तासभर थांबविली जाते. त्याऐवजी बेळगावमधून रात्री 10 वाजता ही रेल्वे धावल्यास प्रवास अधिक सुखकर होईल, असे ते म्हणाले. खासदार जगदीश शेट्टर यांनी वंदे भारत सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच सर्वांच्या प्रयत्नांमुळे वंदे भारत बेळगावपर्यंत येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार
यानिमित्त आयोजित रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी व राजेंद्र कलघटगी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार मंगला अंगडी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार संजय पाटील, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, भाजप महानगर अध्यक्षा गीता सुतार, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नैर्त्रुत्य रेल्वेचे हुबळी विभागीय अॅडिशनल डिव्हिजनल मॅनेजर टी. भूषण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रवास
पहिल्याच वंदे भारतच्या फेरीमधून प्रवास करण्याची संधी बेळगावच्या केंद्रीय विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली. दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हुबळी ते बेळगाव असा वंदे भारतचा प्रवास केला. रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर त्यांनी आपला प्रवास उत्तम झाल्याबद्दल रेल्वेचे आभार मानले. त्याचबरोबर बेळगावमधील काही प्रवाशांनीही या सेवेचा लाभ घेतला.