‘वंदे भारत’चा काश्मीरमध्ये झेंडा!
कटरा-श्रीनगर दरम्यानची चाचणी पूर्ण : फेब्रुवारीपासून सेवा सुरू होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ श्रीनगर
वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रम आणि अभियांत्रिकी चमत्कारांनंतर काश्मीरला रेल्वे जोडणीचे स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. आता भारताने खास डिझाईन केलेली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनही शनिवारी काश्मीरपर्यंत पोहोचली. कटरा ते श्रीनगर मार्गावर या रेल्वेगाडीची चाचणी पूर्ण झाली. एकीकडे देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना भारतीय रेल्वेच्या ‘वंदे भारत’ने काश्मीरमध्ये झेंडा फडकवला आहे.
पहिल्या चाचणीसाठी निघालेली ही वंदे भारत ट्रेन जम्मूतील कटरा येथून शहराच्या बाहेरील नौगाम येथील श्रीनगर स्थानकावर पोहोचली. सकाळी 11:30 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस स्टेशनवर येताच तिचे स्वागत घोषणांनी आणि भारतीय रेल्वेच्या कौतुकाने करण्यात आले. येथील स्टेशनवर काही वेळ थांबल्यानंतर ट्रेन तिची चाचणी पूर्ण करण्यासाठी बडगाम स्टेशनकडे रवाना झाली. जम्मू आणि काश्मीरच्या आव्हानात्मक हिवाळ्याच्या परिस्थितीत अखंडपणे चालण्यासाठी ही ट्रेन इतर रेल्वेंपेक्षा वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे.
कटरा-बारामुल्ला विभागात रेल्वेसेवा चालविण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या सोहळ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी फेब्रुवारी महिन्यापासून ही सेवा सुरू होण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. रेल्वेने उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा 272 किमीचा भाग पूर्ण केला आहे. गेल्या महिन्यात भारतीय रेल्वेने ट्रॅकच्या विविध भागांवर सहा चाचण्या घेतल्या असून त्यात देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल, अंजी खाड पूल आणि चिनाब नदीवरील प्रतिष्ठित आर्च ब्रिज यांचा समावेश आहे. यूएसबीआरएल प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असलेला अंजी खाड पूल हा एक अभियांत्रिकी पराक्रम आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे बोर्डाने गेल्यावर्षी 8 जून रोजी जम्मू आणि काश्मीरच्या आव्हानात्मक हिवाळ्याच्या परिस्थितीत अखंडपणे चालण्यासाठी कटरा-श्रीनगर रेल्वेमार्गासाठी खास डिझाइन केलेली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे अनावरण केले होते. या ट्रेनमध्ये विशेष सेवा प्रदान करण्यात आल्या असून त्यामध्ये हिटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या सुविधेमुळे उणे 10 अंशांपर्यंतच्या तापमानातही प्रवासी आरामदायी प्रवास करू शकतील.
देशाच्या विविध भागात धावणाऱ्या इतर 136 वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत, जम्मू आणि काश्मीरच्या प्रतिकूल हवामान परिस्थितीत ऑपरेशनल आव्हाने आणि प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या ट्रेनमध्ये अनेक अतिरिक्त वैशिष्ट्यो आहेत. यामध्ये पाणी आणि बायो-टॉयलेट टाक्या गोठण्यापासून रोखणाऱ्या प्रगत हीटिंग सिस्टमचा समावेश असल्यामुळे व्हॅक्यूम सिस्टमसाठी उबदार हवा मिळणार आहे.