Vande Bharat Express | वंदे भारत एक्सप्रेसचा पेंटाग्राफ तुटला; भर उन्हात पुणे-हुबळी रेल्वे ३ तास खोळंबली
वंदे भारत एक्सप्रेसचा पेंटाग्राफ तुटला अन्..
मिरज : प्रवासादरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या दौंडज ते बल्हा स्थानका दरम्यान खोळंबली. बिघाड दुरुस्तीसाठी तब्बल तीन तास वंदे भारत रेल्वे बाल्हा स्थानकावर थांबून राहिल्याने शेकडो प्रवाशांचे हाल झाले. विशेष करून एसी बोगीतील प्रवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागला. पाणी अथवा जेवणाचीही सोय नसल्याने काही प्रवाशांनी गोंधळ घालत रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर संताप व्यक्त केला.
सोमवारी पुणे-मिरज-हुबळी बंदे भारत (गाडी क्रमांक २०६७०) ही गाडी पुण्यातून सुटल्यानंतर पुणे सातारा दरम्यान वेल्हा ते नीरास्थानकाच्या मध्येच गाडीचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे अचानक बंद पडली. यावेळी गाडीचा बिद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ऐन उन्हामध्ये पुणे हुबळी वंदे भारतच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गाडीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे एसी बंद पडला. तर ज्येष्ठ प्रवाशांना साधे पाणीही न दिल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
तर पुन्हा गाडीच्या दुरुस्तीनंतर तीन तासाने हुबळीकडे गाडी मार्गस्थ करण्यात आली. मिरज स्थानकात सायंकाळी ६ बाजून ४० मिनिटांनी येणारी गाडी तब्बल अडीच तास उशिराने म्हणजे सायंकाळी ९ बाजून आठ मिनिटांनी दाखल झाली. तीव्र उन्हामध्ये गाडी थांबल्यामुळे प्रवाशांना गाडी बाहेर पडणे अडचणीचे झाले.