For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिला हॉकी संघात वंदना कटारियाचा समावेश

06:53 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिला हॉकी संघात वंदना कटारियाचा समावेश
Advertisement

भारताचा सामना होणार नेदरलँड्स, स्पेन, जर्मनीशी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अनुभवी आघाडीपटू वंदना कटारियाला एफआयएच प्रो लीग भुवनेश्वर टप्प्यासाठीच्या 24 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघात स्थान देण्यात असून किशोरवयीन फॉरवर्ड सोनमचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

15 फेब्रुवारीपासून भारताचा सामना नेदरलँड्स, स्पेन आणि जर्मनीशी दोनदा होणार आहे. धडाकेबाज मिडफिल्डर सलीमा टेटे भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळेल आणि फॉरवर्ड नवनीत कौर उपकर्णधार म्हणून काम पाहील. महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघात नसलेल्या कटारिया हिला बचावपटू निक्की प्रधान आणि ज्योती छेत्री, मिडफिल्डर बलजित कौर आणि फॉरवर्ड मुमताज खान आणि ऊताजा दादास यांच्यासह या संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

या संघात अनुभवी खेळाडू आणि उत्साहवर्धक तऊण प्रतिभेचे चांगले मिश्रण आहे, जे उच्चस्तरीय स्पर्धेचा सामना करताना महत्त्वाचे ठरेल. आमचे लक्ष प्रत्येक स्थानावर मजबूत पर्यायांसह संतुलित संघ तयार करण्यावर आहे, असे भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले. गोलरक्षक बनवारी सोळंकी, बचावपटू अक्षता आबासो ढेकळे आणि ज्योती सिंग यांच्यासह फॉरवर्ड साक्षी राणा, अन्नू आणि सोनम यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

19 वर्षीय सोनमला अलीकडेच संपलेल्या महिला हॉकी इंडिया लीगमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर वरिष्ठ स्तरावर आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी आहे. हॉकी इंडियामध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली होती. काही तऊण खेळाडू, विशेषत: ज्यांनी महिला हॉकी इंडिया लीगमध्ये उत्तम खेळ केला आहे, त्यांची कामगिरी पाहून मला खूप आनंद होत आहे, असे हरेंद्र म्हणाले.

आम्हाला संघाच्या तयारीवर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की, जगातील काही सर्वोत्तम संघांविऊद्ध चांगली कामगिरी करण्याची क्षमता आमच्यात आहे,” असे ते पुढे म्हणाले. ‘एफआयएच’च्या नियमांनुसार, जर एखाद्या संघाचे प्रो लीग टप्प्यात 4 पेक्षा जास्त सामने व्हायचे असतील, तर ते पहिल्या 4 सामन्यांनंतर त्यांच्या 24 सदस्यीय संघात सुधारणा करू शकतात. तथापि कोणतेही बदल त्यांच्या आधी मंजूर करण्यात आलेल्या बदली यादीतील खेळाडूंचा वापर करून करावे लागतील.

Advertisement
Tags :

.