वादग्रस्त विधानावर व्हान्स यांचा खुलासा
संबंधित विधान एचवन बी व्हिसाधारकांसाठी नव्हते
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी त्यांच्या एका वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण केले आहे. अमेरिकेतील कंपन्यांकडून अमेरीकेत कामसाठी आणले जाणारे इतर देशांमधील कर्मचारी हे ‘इन्ंडेंचर्ड एम्प्लॉईज’ (करारबद्ध कामगार) आहेत, असे त्यांचे विधान होते. या अवमानजनक विधानामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या विविध देशांच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या सरकारनेही तीव्र शब्दांमध्ये या विधानाचा निषेध केला होता. अखेर व्हान्स यांनी रविवारी आपल्या विधानावर, ते न नाकारता स्पष्टीकरण दिले आहे. आपले विधान कर्मचाऱ्यांशी संबंधित नव्हते. तर ते त्यांना अमेरिकेत आणणाऱ्या अमेरिकेच्याच कंपन्यांना उद्देशून होते, असे त्यांनी त्यांच्या नव्या विधानाद्वारे स्पष्ट केले आहे.
व्हान्स यांच्या म्हणण्यानुसार एचवन बी व्हिसाच्या माध्यमातून थेट आलेले कर्मचारी अमेरिकेच्या समकक्ष कर्मचाऱ्यांपेक्षा वर्षाला 20 हजार डॉलर्स कमी कमावतात. तर ज्या विदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेतल्या कंपन्या अमेरिकेत आणतात, ते अमेरिकेतील समकक्ष कर्मचाऱ्यांपेक्षा प्रतिवर्ष 48 हजार डॉलर्स कमी मिळवितात. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचा मोठा लाभ होतो. आपल्याला अधिक लाभ मिळावा, म्हणून अमेरिकन कंपन्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या स्थानी अन्य देशांमधील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देत आहेत. त्यामुळे कंपन्यांचा मोठा लाभ होत आहे, तथापि, अमेरिकेतील सुशिक्षित युवकांवर बेकार राहण्याची वेळ येत आहे. अमेरिकन युवकांना न्याय मिळावा, म्हणून अमेरिका आपल्या स्थलांतर धोरणात मोठे परिवर्तन करीत आहे, असे प्रतिपादन जेडी व्हान्स यांच्याकडून केले गेले.
अमेरिकन नागरीकांमध्ये भेदभाव नाही
अमेरिकेत अनेक देशांच्या लोकांना नागरीकत्व मिळाले आहे. माझी पत्नीही भारतीय वंशाची अमेरिकन नागरीक आहे. माझ्या पत्नीचे मातापिताही अमेरिकेन स्थलांतरीत झाले असून ते अमेरिकेचे नागरीक आहेत. मूळचे अमेरिकन लोक आणि विदेशांमधून अमरिकेत येऊन रीतसर अमेरिकेचे नागरीकत्व मिळविलेले लोक यांच्यात अमेरिका किंवा तिचे प्रशासन कोणताही भेदभाव करीत नाही. अमेरिकेच्या इतर वंशातील नागरीकांना आम्ही दुय्यम दर्जाचे नागरीक मानत नाही. त्यांचा सन्मान आम्ही करतो, असे स्पष्टीकरण जेडी व्हान्स यांच्याकडून करण्यात आले.
भारताची टीका
अमेरिकेच्या समृद्धीत भारतातून तेथे गेलेल्या लक्षावधी एचवन बी व्हिसा धारकांचे महत्वाचे योगदान आहे. अशा कर्मचाऱ्यांना करारबद्ध कामगार म्हणणे अवमानजनक आहे. अशा विधानांमधून वसाहतवादी विचारसरणीचा दु:खद आणि यातनामय प्रत्यंतर येतो, अशी तीव्र टीका भारताने केली होती. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांनीही त्यांची नाराजी तेथील प्रशासनाकडे व्यक्त केली.
