क्लासिकल स्पर्धेत व्हॅन फोरेस्टचा मॅग्नस कार्लसनला धक्का
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असणारा नॉर्वेचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला माल्मो येथे झालेल्या तेपे सिगेमन अँड कंपनी बुद्धिबळ स्पर्धेत जॉर्डन व्हॅन फोरेस्टकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. जवळपास वर्षभरानंतर कार्लसनला क्लासिकल बुद्धिबळात पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे.
आजकाल क्वचितच क्लासिकल बुद्धिबळात खेळणारा कार्लसन नॉर्वे चेस 2025 मध्ये भारताच्या डी गुकेशकडून झालेल्या नाट्यामय पराभवानंतर सर्व पाच क्लासिकल लढतीत अपराजित राहिला होता. नॉर्वेतील स्पर्धेत गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसनने संतापाच्या भरात टेबलवर जोराने हात आपटत आपली निराशा व्यक्त केली होती. व्हॅन फोरेस्टने बहुतांश वेळ खेळावर नियंत्रण ठेवले होते आणि अंतिम टप्प्यात कार्लसनला त्याने सावरण्याची कोणतीही संधी दिली नाही. अखेरीस जाळ्यात अडकल्यानंतर कार्लसनने सामना सोडून दिला.
अन्य एका सामन्यात भारताच्या अर्जुन एरिगेसीने नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला. तो या स्पर्धेत अद्याप अपराजित राहिला आहे. 14 वर्षीय यागिझ कान एर्डोगमसने निल्स ग्रँडेलियसचा पराभव केला. त्याचा हा सलग चौथा पराभव होता.