7 कंपन्यांच्या मूल्यात 1.25 लाख कोटींची घसरण
रिलायन्स इंडस्ट्रिज सर्वाधिक नुकसानीत, एसबीआय, एचडीएफसी यांचे मूल्य वाढले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय शेअर बाजारातील आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1.25 लाख कोटी रुपयांनी कमी झालेले दिसून आले. यामध्ये सर्वाधिक फटका बसला तो रिलायन्स इंडस्ट्रीज यांना. गच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 532 अंकांनी घसरला होता. तर एनएसई निफ्टी निर्देशांक 181 अंकांनी घसरणीसह बंद झाला होता. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री बाजारावर दबाव निर्माण करु शकली. तसेच कच्च्या तेलाच्या घटत्या किमती व रुपयात सुधारणा यांचा सकारात्मक परिणाम काहीसा बाजारावर होता. पण मान्सूनच्या प्रगतीबाबत चिंतेने गुंतवणूकदार संभ्रमित झाले.
दहा आघाडीवरच्या कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलामध्ये घसरण झालेली दिसून आली तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या बाजार भांडवलामध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजारातील नंबर एक वर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 39 हजार 718 कोटी रुपयांनी घसरत 17 लाख 47 हजार 321 कोटी रुपयांवर खाली आले.
विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 43 हजार कोटी
याच दरम्यान विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जूनमध्ये आतापर्यंत 43 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही स्थिती दिसून आली. आर्टिफिशियल इंंटेलिजन्ससंबंधित भीतीचा धसका शेअरबाजाराने घेतला. यामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून गुंतवणूक काढून घेण्यावरती भर दिला होता. वर्ष 2026 मध्ये पाहता आतापर्यंत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून जवळपास 2.67 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
या कंपन्यांच्या मूल्यात झाली घसरण
कंपनी घसरलेले मूल्य सध्याचे मूल्य
रिलायन्स 39,718 कोटी 17.47 लाख कोटी
टीसीएस 20,134 कोटी 7.95 लाख कोटी
भारती एअरटेल 18,736 कोटी 10.96 लाख कोटी
लार्सन टुब्रो 16880 कोटी 5.44 लाख कोटी
एलआयसी 14,610 कोटी 5.06 लाख कोटी
बजाज फायनान्स 9681 कोटी 5.54 लाख कोटी
हिंदुस्थान युनिलिव्हर 5909 4.98 लाख कोटी
स्टेट बँक ऑफ इंडिया 12,692 कोटी 9.03 लाख कोटी
आयसीआयसीआय बँक 4484 कोटी 9.05 लाख कोटी
एचडीएफसी बँक 4101 कोटी 11.51 लाख कोटी