बंद घर फोडून सहा लाखाचा ऐवज लंपास
कोकरुड :
मानेवाडी (ता. शिराळा) येथील मुख्य रस्त्यालगत असणारे कृष्णा भाऊ माने यांचे राहते घर फोडून चोरट्यांनी सहा लाखाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी घडली असून भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सदर घटनेची नोंद कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी कृष्णा माने यांचे राहते घर अज्ञात व्यक्तिने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख २० हजार किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे साखळीचे गंठण, ४८ हजार रूपयांचे १२ ग्राम वजनाचे दोऱ्यातील सोन्याचे गंठण, ४० हजार रूपयांचे १० ग्राम वजनाचे दोऱ्यातील सोन्याच्या मण्याची माळ, १६ हजार रूपयांचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील वेल, १२ हजार रूपयांचे ३ वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, साडेतीन हजारांचे तीन चांदीचे पैंजणाचे जोड, तीन हजार रूपयांचे चांदीची जोडवी, साडेअकरा हजार रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघड झाले आहे. आठवड्यात दोन घरफोड्या झाल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे. अधिक तपास सपोनि जयवंत जाधव करत आहेत.