सावंतवाडी वैश्यवाड्यात गणेशभक्तीचा जागर; 6,112 मोदकांचा विशेष नैवेद्य, श्रींचे पूजन
सावंतवाडी : वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या 21 दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामुदायिक अथर्वशीर्ष पठणासह सहस्र मोदक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी श्री गणरायाला तब्बल 6,112 मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
श्री. दिक्षित भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पार पडला. पूजेचे मानकरी गुरुनाथ मठकर होते. त्यानंतर दुपारी महाआरती करण्यात आली. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते.
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कविलकाटे-कुडाळ येथील महिला मंडळाचा फुगडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 4 ऑक्टोबर रोजी भव्य विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.