गोलंदाजी क्रमवारीत वैष्णवी शर्माची मोठी झेप
वृत्तसंस्था, दुबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर, भारताची युवा फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा हिने मंगळवारी जाहीर झालेल्या महिलांच्या आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत 53 स्थानांची मोठी झेप घेत 94 वे स्थान मिळवले आहे.
20 वर्षीय वैष्णवीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार बळी घेतले, तर मालिकेतील निर्णायक सामन्यात तिने पाच बळी मिळवले. सायली सातघरे हिनेही क्रमवारीत प्रगती केली असून, शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सहा षटकांत 11 धावा देऊन 2 बळी घेतल्यामुळे ती 18 स्थानांच्या सुधारणेसह 85 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात दोन बळी घेणारी क्रांती गौड एक स्थान वर सरकून 24 व्या क्रमांकावर आली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत, सलामीवीर प्रतीका रावल हिने मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावल्यामुळे तीन स्थानांची सुधारणा करत 18 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच, शेवटच्या सामन्यात आक्रमक 51 धावा करणारी शफाली वर्मा आठ स्थानांच्या सुधारणेसह संयुक्तपणे 65 व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
