विठ्ठलच्या जयघोषात दंग झाली वैष्णवनगरी
16 लाख वैष्णवांच्या उपस्थितीत रंगला आषाढी एकादशीचा सोहळा, विठ्ठलाच्या दर्शनाने भाविकांची तृप्ती
संतोष रणदिवे/ पंढरपूर
रूप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।
बहुता सुकृताची जोडी । म्हणोनी विठ्ठली आवडी ।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवरू ।।
पंढरीस आलेल्या लाखो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा मोठ्या उत्सहात भक्तीभावात झाला. चंद्रभागा तीर, भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये सर्वत्रच विठ्ठलभक्तांची मोठी दाटी झाली होती. यावेळी टाळ मृदुंगाचा निनाद आणि ओठी जय हरी विठ्ठलाचा जयघोष भाविकांकडून होत असल्याने पंढरी परिसराचा आसमंत दुमदुमून निघाला. तर ही वैष्णवनगरी पंढरीच जय हरी विठ्ठलच्या जयघोषात दंग झाल्याचा क्षण अनुभवता आल्याने धन्य धन्य झालो पांडुरंगा असेच समाधान लाखो भाविकांनी व्यक्त केले.
आपल्या दिंड्यासोबत आलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा बुधवारी झाला. यावेळी सुमारे 16 लाखांहून अधिक भाविकांची मांदियाळी पंढरीत चंद्रभागेतीरी एकवटली होती. त्यामुळे साहजिकच भीमातीर भक्तीच्या अनोख्याच रंगात न्हाऊन निघालेला दिसून आला. आषाढी एकादशींची सुरूवात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करून सुरू झाली होती. पहाटेपासूनच एकादशीमुळे भाविकांनी चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. यंदा मान्सूनपूर्व व मान्सूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने चंद्रभागेमध्ये मुबलक पाण्याची उपलब्धतता होती. त्यामुळे पंढरीत दाखल झालेल्या लाखो भाविकांनी चंद्रभागा स्नानाचा आनंद लुटला. चंद्रभागा नदी वाळवंटात सकाळपासूनच हरिनामाचा गजर सुऊ होता.
चंद्रभागा स्नानानंतर एकादशीच्या नियमाप्रमाणे पंढरीतील नगरप्रदक्षिणा करण्यास भाविकांनी सुरूवात केली. यावेळी लाखो भाविक प्रदक्षिणा मार्गावर दिसून आले. यांच्यासह दिंड्या देखील प्रदक्षिणा मार्गावर येऊन नगरप्रदक्षिणा घालत होत्या. संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. एकादशीमुळे मोठया संख्येने भाविक पंढरीत दाखल झाल्याने विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग ही पत्राशेडच्या पुढे जाऊन पोहचली होती. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज सुमारे 18 ते 20 तासांचा अवधी लागत होता. तरीही दर्शनरांगेमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा मंदिर समितीच्यावतीने भाविकांना दर्शन रांगेत साबुदाणा खिचडी व चहाचे वाटप करण्यात येत होते तर दर्शन रांग पूर्णपूणे वॉटरप्रुफ केल्याने भाविकांचे पावसापासून संरक्षण झाले आहे
प्रासादिक वस्तूंची मोठी विक्री
आषाढी वारीनिमित्ते पंढरपूर शहरासह राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने गेली तीन ते चार दिवसांपासूनच थाटली होती. परंतु या कालावधीमध्ये या व्यवसाय वारीला ग्राहकांची प्रतिक्षाच होती. त्यामुळे व्यवसाय वारी मोठ्या प्रमाणात फुलणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. परंतु मंगळवार आणि बुधवारी एकादशीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत दाखल झाले. त्यामुळे या व्यवसाय वारीची ग्राहकांची प्रतिक्षा संपली आणि व्यवसाय वारीत समाधानाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये प्रासादिक वस्तूंना मोठी मागणी असल्याचे पहावयास मिळाले तर संसारउपयोगी वस्तू, उबदार कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आदी गोष्टींची विक्री समाधानकारक झाली. पावसाने उसंत घेतल्याने भाविकांनीसुध्दा थांबून खरेदी केली.