वैशाली रमेशबाबू नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत छाप उमटविण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंगर-नॉर्वे
महिला बुद्धिबळातील उगवत्या ताऱ्यांपैकी एक असलेली वैशाली रमेशबाबू नॉर्वे बुद्धिबळ महिला 2025 स्पर्धेत भाग घेण्यास आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या आक्रमक आणि मनमोहक खेळण्याच्या शैलीने छाप उमटविण्यास सज्ज झाली आहे. या स्पर्धेतील आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.
सध्या 2475 च्या (नोव्हेंबर, 2024 नुसार) लाईव्ह रेटिंगसह महिला बुद्धिबळाच्या जागतिक क्रमवारीत 16 व्या क्रमांकावर असलेल्या वैशालीची कामगिरी प्रभावी राहिली आहे. 2023 मध्ये तिने फिडे महिलांच्या ग्रँड स्विस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून यंदाच्या महिला कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळविले. वैशालीची कथा तिच्या स्पर्धेतील विजयांच्या पलीकडे आहे.
2023 मध्ये ती भारतीय बुद्धिबळातील आघाडीच्या खेळाडूंच्या गटात सामील होताना भारतातील तिसरी महिला ग्रँडमास्टर बनली. त्याच वर्षी भारतीय खेळातील तिच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन तिला क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. यंदा तिने भारताच्या ऑलिम्पियाडमधील विजयात मोलाची भूमिका बजावली, जी तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची एक महत्त्वाची कामगिरी राहिली आहे.
आपल्या खेळाकडील दृष्टिकोनाचे वर्णन ‘आक्रमक’ असे करताना वैशालीने आपल्या हातून काही सामन्यांत चांगला आक्रमक खेळ झालेला आहे, याकडे लक्ष वेधले आहे.