वैराग्य म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी राहणे
भगवंत म्हणाले, अर्जुना तू समदृष्टी ठेव, कारण त्यासारखा ह्या जगात दुसरा लाभ नाही. त्यावर अर्जुन त्यांना म्हणाला, साम्यदृष्टी प्राप्त होण्यासाठी मन कायम तुमच्या चरणी एकाग्र राहिले पाहिजे पण ते चंचल, क्षोभक, बलयुक्त व वळवण्यास कठीण असल्याने त्याचा निग्रह करणे अशक्य आहे. मनाच्या अवाढव्य आकारामुळे त्याला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. ते बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीस जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते. त्यामुळे चांगले काय, वाईट काय हे बुद्धी ठरवू शकत नाही. आता आपण समाधानी आहोत असे वाटणाऱ्या संतोषी माणसाला नव्या आशा लावते. त्यामुळे मनुष्य एका ठिकाणी राहिला तरी ते त्याला दाही दिशांना फिरवते. त्याला आवरायचा प्रयत्न केला तर ते जास्त उसळते. त्याला अडवणे मुळीच पसंत नसल्याने त्याला गप्प बसवणे शक्य होत नाही. म्हणून हे मन निश्चल राहील आणि साम्यावस्था प्राप्त होईल असे काही मला वाटत नाही. ह्याप्रमाणे अर्जुनाने मन देवांच्या पायाशी एकाग्र करण्यात येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. मनुष्य प्रपंचात कितीही अडचणी आल्या तरी तेथे तो मन एकाग्र करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला प्रपंच मनापासून आवडत असतो आणि तितकीच अध्यात्म साधनेची त्याला नावड असल्याने तेथे तो मनाची एकाग्रता साधू शकत नाही.
भगवंतांना सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन असे काहीतरी म्हणणार ह्याची कल्पना होतीच. अर्जुनाचे वरील मनोगत ऐकल्यावर पुढील श्लोकात अर्जुनाच्या अडचणीवर उपाय सांगताना ते म्हणाले, अर्जुना, मन हे नि:संशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठिण आहे. परंतु सततच्या अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो.
अवश्य मन दु:साध्य म्हणतोस तसे चि ते । परी अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे ।। 35।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाकडे कबूल केले की, तू म्हणत आहेस तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चंचलच आहे परंतु वैराग्य आणि अभ्यासाच्या जोरावर मन काही काळाने स्थिर होईल.
वैराग्य म्हणजे आहे त्या परिस्थितीत समाधानी राहून कसलीही अपेक्षा, इच्छा न करणे. अर्थात ह्यासाठी मन आत्तापर्यंत जसे पुढे जात होते त्याविरुद्ध त्याला जायला लावल्यासारखे आहे. त्यामुळे वैराग्य ही अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही म्हणून सुरवातीला चुका होणारच हे गृहीत धरून आहे त्या स्थितीत समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा. चूक लक्षात आल्यावर ती चूक दुरुस्त करून नेटाने वैराग्याचा सराव करावा. ह्या सरावालाच अभ्यास असे म्हणतात. त्यासाठी वैराग्य अवस्थेत म्हणजे आहे त्यात समाधानी राहणे हे आपल्या हिताचे आहे हे मनाला वारंवार समजावून सांगावे म्हणजे ते त्यासाठी तयार होते. असा अभ्यास सतत करत राहिल्यास हळूहळू मन वैराग्यपूर्ण होईल आणि एके ठिकाणी स्थिर होईल. मनाचे आणखी एक वैशिष्ट्या सांगताना भगवंत पुढे सांगतात की, ह्या मनाची एक गोष्ट चांगली आहे, त्याला एकदा एखाद्या गोष्टीत आवड निर्माण झाली की, त्याला तेथेच राहायला आवडते. क्रमश: