आयसीसी टी-20 क्रमवारीत वैभव सूर्यवंशीची मोठी झेप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुऊवात केल्यानंतर उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशीने ताज्या आयसीसी पुऊष टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. हरारे येथे झिम्बाब्वेविऊद्ध भारताने 3-0 अशा फरकाने जिंकलेल्या टी-20 मालिकेत 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्याबद्दल या 15 वर्षीय खेळाडूला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. सूर्यवंशीच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत 230 स्थानांची प्रगती करता आली आणि तो टी-20 फलंदाजांच्या यादीत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा 48 व्या स्थानावर पोहोचला आहे.
सूर्यवंशीकडे सध्या 536 रेटिंग पॉइंट्स आहेत आणि तो भारताचा सहकारी खेळाडू ईशान किशनच्या मागे आहे, जो ताज्या टी-20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. झिम्बाब्वेविऊद्धच्या दुसऱ्या सामन्यात 81 धावा केल्यानंतर किशनने 916 गुणांचा टप्पा गाठला, जे कोणत्याही टी-20 फलंदाजाचे आतापर्यंतचे तिसरे सर्वोच्च रेटिंग आहे. त्याने मालिका 910 गुणांसह पूर्ण केली. तो दुसऱ्या स्थानावर असलेल्या साहिबजादा फरहानपेक्षा (848 गुण) बऱ्याच फरकाने पुढे आहे.
किशनचे कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग हे भारताचे अन्य स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (912) आणि विराट कोहली (909) यांच्या रेटिंगपेक्षाही अधिक आहे. आयसीसीच्या आकडेवारीनुसार, अभिषेक शर्माच्या नावावर टी-20 फलंदाजीतील सर्वोच्च रेटिंगचा (931 गुण) विक्रम आहे, त्यानंतर इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) आणि किशन (916) यांचा क्रमांक लागतो.
तिलक वर्मानेही दोन स्थानांची सुधारणा करत सहावे स्थान गाठले आहे, तर श्रेयस अय्यर सात स्थानांच्या प्रगतीसह टी-20 फलंदाजांच्या यादीत 24 व्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजी क्रमवारीत रवी बिश्नोईने मोठी झेप घेतली असून झिम्बाब्वे मालिकेत तीन बळी घेतल्यानंतर त्याने 31 स्थानांची प्रगती केली आहे आणि 41 व्या स्थानावर मजल मारली आहे. झिम्बाब्वेच्या खेळाडूंच्या क्रमवारीतही बदल झाले असून रायन बर्ल सहा स्थानांच्या प्रगतीसह टी-20 फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे 85 व्या स्थानावर पोहोचला आहे. वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझराबानीने 10 स्थानांची प्रगती करत 26 वे स्थान मिळवले आहे.
एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिल पुन्हा अव्वल
एकदिवसीय क्रमवारीमध्ये न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल वेस्ट इंडिजविऊद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत खेळू न शकल्याने शुभमन गिलने फलंदाजांमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीनुसार, मिचेल जानेवारीपासून अव्वल स्थानावर होता. नामिबियाचा फिरकी गोलंदाज बर्नार्ड स्कोल्ट्झने मोठी झेप घेतली असून युट्रेक्ट येथे झालेल्या आयसीसी पुऊष क्रिकेट विश्वचषक लीग 2 तिरंगी मालिकेतील कामगिरीनंतर तो एकदिवसीय गोलंदाजांमध्ये पाच स्थानांनी प्रगती करून सातव्या स्थानावर पोहोचला आहे.