For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैभव सूर्यवंशीचे पुन्हा वादळी शतक

06:58 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
वैभव सूर्यवंशीचे पुन्हा वादळी शतक
Vaibhav Suryavanshi scores another explosive century.
Advertisement

वृत्तसंस्था/ बेनोनी, द.आफ्रिका

Advertisement

अॅरोन जॉर्ज व वंडरबॉय वैभव सूर्यवंशी यांची दणकेबाज शतके आणि किशन सिंग, मोहमद इनानसह इतर गोलंदाजांचा भेदक मारा यांच्या बळावर भारताच्या युवा (यू-19) संघाने येथे झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या युवा वनडे सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेवर 233 धावांनी दणदणीत विजय मिळवित मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. 127 धावा व एक बळी मिळविणारा कर्णधार वैभव सूर्यवंशीला सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले.

भारताने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर 50 षटकांत 7 बाद 393 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 35 षटकांत 160 धावांत गुंडाळून एकतर्फी विजय मिळविला. दुसरा सामना जिंकून भारताने याआधीच मालिका जिंकली होती.

Advertisement

सूर्यवंशीचे तुफान

सूर्यवंशीने या सामन्यातही धडाकेबाज फलंदाजी करीत केवळ 74 चेंडूत 9 चौकार, 10 षटकारांच्या मदतीने 127 धावा झोडपल्या. त्याचा सलामीचा साथीदार अॅरोन जॉर्जनेही 118 धावांची शतकी खेळी करताना 25.4 षटकांत 227 धावांची सलामी दिली. वैभवने या मालिकेत 68.66 सरासरीने व 187 च्या स्ट्राईक रेटने 206 धावा फटकावल्या. त्यात एक शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे. वैभवने आतापर्यंतच्या 18 युवा वनडेतील 18 डावांत 973 धावा जमविल्या असून 54.05 च्या सरासरीने व 164.08 च्या स्ट्राईकरेटने या धावा जमविल्या आहेत. त्यात 3 शतके, 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 171 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचा साथीदार जॉर्जने 106 चेंडूंच्या खेळीत 16 चौकार मारले. जॉर्जने नंतर वेदांत त्रिवेदीसमवेत 52 धावांची भागीदारीही केली. वेदांतने 42 चेंडूत 34 धावा जमविल्या.

दमदार सुरुवात झाल्यानंतरही भारतीय युवा संघाची 43.2 षटकांत 7 बाद 335 अशी घसरण झाली होती. पण मोहमद इनान (19 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 28) व हेनिल पटेल (21 चेंडूत नाबाद 19) यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताला चारशेच्या जवळपास मजल मारून दिली. एन्तान्दो सोनी द.आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 61 धावांत 3 बळी मिळविले तर जेसन रॉलेसने 59 धावांत 2 बळी टिपले.

द.आफ्रिका युवा संघाला हे आव्हान पेलवले नाही आणि 11 व्या षटकांत त्यांची स्थिती 5 बाद 50 अशी झाली. डॅनियल बोसमन (40), पॉल जेम्स (41), कॉर्न बोथा (नाबाद 36) यांनी भारतीय गोलंदाजांचा थोडाफार प्रतिकार केला. पण त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. किशन सिंग (15 धावांत 3 बळी), इनान (36 धावांत 2) व इतरांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव 160 धावांत आटोपला. हेनिल पटेल, कनिष्क चौहान, उद्धव मोहन, आरएस अंबरीश व वैभव सूर्यवंशी यांनी एकेक बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : भारत यू-19 संघ 50 षटकांत 7 बाद 393 : वैभव सूर्यवंशी 74 चेंडूत 9 चौकार, 10 षटकारांसह 127, अॅरोन जॉर्ज 106 चेंडूत 16 चौकारांसह 118, वेदांत त्रिवेदी 42 चेंडूत 34, अभिज्ञान कुंडू 21, कनिष्क चौहान 10, मोहमद इनान 19 चेंडूत नाबाद 28, हेनिल पटेल 21 चेंडूत नाबाद 19, अवांतर 26. एन्तान्दो सोनी 3-61, मायकेल व्रुइजकॅम्प1-68, जेसन रॉलेस 2-59.

दक्षिण आफ्रिका यू-19 संघ 35 षटकांत सर्व बाद 160 : जेसन रॉलेस 19, बोसमन 40, पॉल जेम्स 5 चौकार, 1 षटकारासह 41, कॉर्न बोथा नाबाद 36. किशन सिंग 3-15, मोहमद इनान 2-36, हेनिल पटेल 1-13, सूर्यवंशी 1-10, उद्धव मोहन 1-24, अंबरीश 1-26, चौहान 1-34.

Advertisement
Tags :

.