वैभव सूर्यवंशीचे शतक हुकले
वृत्तसंस्था, बेंगळूर
2026 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी सलामीचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. वैभव आणि ईश्वरण या सलामीच्या जोडीने 161 धावांची दीडशतकी भागिदारी केल्याने पूर्व विभागाने पहिल्या डावात 266 धावा जमविल्या.
या सामन्यात पूर्व विभागाचे वैभव सूर्यवंशीकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मध्य विभागाचा पहिला डाव 266 धावांत आटोपला होता. त्यानंतर पूर्व विभागाने सोमवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. सूर्यवंशीने 81 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांसह 92 धावा झोडपल्या तर अभिमन्यु ईश्वरनने 106 चेंडूत 8 चौकारांसह 69 धावा जमविल्या. या जोडीने 161 धावांची भागिदारी केल्यानंतर पूर्व विभागाचा डाव कोलमडला. त्यांचे उर्वरित 9 गडी 95 धावांत तंबूत परतले. मध्य विभागाच्या मुकेशकुमारने तसेच हर्ष दुबेने 66 धावांत 4 तर यश ठाकुर आणि आर्यन पांडे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दिवसअखेर मध्य विभागाने दुसऱ्या डावात 20 षटकांत 3 बाद 45 धावा जमविल्या. अमन मोखाडे 23 धावांवर खेळत आहे. पूर्व विभागाच्या मुकेशकुमारने 2 तर शमीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: मध्य विभाग प. डाव 266, पूर्व विभाग प. डाव 266 (वैभव सूर्यवंशी 92, अभिमन्यू ईश्वरन 69, घरमी 25, इशान किशन 16, अनुकुल रॉय 16, कुरेशी 13, दुबे 4-66, यश ठाकुर व आर्यन पांडे प्रत्येकी 3 बळी). मध्य विभाग दु. डाव 3 बाद 45 (मोखाडे खेळत आहे 23, मुकेशकुमार 2-14, शमी 1-13),
वैभवचा आणखी एक विक्रम
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत अर्धशतक झळकविणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे. वैभवने आपल्या वयाच्या 15 वर्षे 157 व्या दिवशी हा पराक्रम केला असून त्याने केवळ 42 चेंडूत सारांश जैनच्या गोलंदाजीवर षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने या स्पर्धेच्या गेल्या 57 वर्षांतील विक्रम मागे टाकला. दुलीप करंडक स्पर्धेत यापूर्वी सर्वात कमी वयात अर्धशतक झळकविण्याचा विक्रम लक्ष्मण सिंगच्या नावावर होता. त्याने 1969 साली या स्पर्धेत आपल्या वयाच्या 16 वर्षे 23 दिवस असताना हा पराक्रम केला होता. तसेच भारताचा फिरकी गोलंदाज पीयूष चावलाने 2005 साली या स्पर्धेत आपल्या वयाच्या 16 वर्षे 307 दिवस असताना अर्धशतक झळकविले आहे. सचिन तेंडुलकरने 1990-91 मध्ये या स्पर्धेत आपल्या वयाच्या 17 वर्षे 262 दिवस असताना शतक झळकविले होते.