वैभव पाटील भाजपमध्ये दाखल
विटा :
विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का दिला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार सत्यजित पाटील, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष पाटील यांनी प्रवेश करताच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली.
विधानसभा निवडणूक शरद पवार गटाकडून लढलेले वैभव पाटील पक्षात अस्वस्थ होते. पक्षाकडून अपेक्षित ताकद मिळत नसल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत विचार विनिमय करण्यासाठी पाटील गटाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठकदेखील पार पडली. कार्यकर्त्यांनी वैभव पाटील यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्यानंतर पाटील यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी मुंबईत त्यांचा भाजप प्रवेश पार पडला. शहरातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
वैभव पाटील यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली - मंत्री चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वैभव पाटील यांच्या येण्याने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची वर्षानुवर्षे विटा शहरावर सत्ता आहे. विटा शहरात आमचे अॅड. विनोद गोसावी, अनिल मनोहर बाबर असे जुने कार्यकर्ते आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर आणि आटपाडीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख असे मोठे नेते भाजपमध्ये काम करत आहे.
या सर्वांबरोबर वैभव पाटील आल्याने भाजपाची मतदारसंघात मोठी ताकद वाढली आहे. विकासासाठी वैभव पाटील यांच्या पाठीशी राहू. खानापूर आटपाडी मतदारसंघाने नेहमी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. वैभव पाटील यांच्या प्रवेशाने या मतदारसंघात भाजपा आणखीनच बळकट झाली आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.
- मुंबईत शक्तीप्रदर्शन, विट्यातही जल्लोष
वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी त्यांच्याबरोबर शहरातील माजी नगरसेवक आणि युवक नेते पदमसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला गेले होते. मुंबईत वैभव पाटील यांचा प्रवेश होताच विट्याच्या शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. समाजमाध्यमावर वैभव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे फोटो शेअर करीत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाचे स्वागत केले.
- लकरच मुख्यमंत्री विट्यात
लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विटा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचवेळी माजी आमदार सदाशिव पाटील भाजपच्या व्यासपिठावर प्रवेश करतील. वैभव पाटील यांनी पक्ष प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी त्यांचे स्वागत करताना पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवा, पक्ष तुम्हाला ताकद देईल, असे आश्वासन दिले.
- विकासाच्या प्रवाहामध्ये सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश जगात महासत्ता म्हणून उदयास येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्य प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. विकासाच्या वारीत सहभागी होण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप ताकद देईल, अशी अपेक्षा आहे. भविष्यात मतदारसंघातील सर्वांना बरोबर घेऊन भाजपचे काम ताकदीने करणार आहे.
- वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष विटा