कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हॉटेलिंग क्षेत्रातही वडणगे गाव आघाडीवर

01:24 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / अवधुत शिंदे :

Advertisement

शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले करवीर तालुक्यातील कृषिप्रधान वडणगे गाव हॉटेलिंग व्यवसाय क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात गावातील तरुणाईकडून हॉटेल व्यवसायात करिअर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. चोखंदळ खवैय्यांची मने जिंकून अनेकजण त्या व्यवसायामध्ये यशस्वी देखील होत आहेत. हॉटेल्सबरोबरच अन्य व्यवसाय सुरु करण्याकडेही युवकांचा कल आहे.

Advertisement

वडणगेतील पवार पाणंद रोड परिसरात एकाच ठिकाणी 8 ते 10 हॉटेल झाली आहेत. गावातील आजुबाजूच्या परिसरासह शहरातील लोकांना विविध चविष्ट पदार्थांची चव चाखण्यासाठी वडणगे गाव आकर्षित करत आहे. गावात अनेक स्टॉल्स, छोटी- मोठी हॉटेल्स उभी राहिली आहेत. गावातील तलावाच्या परिसरात विविध चवदार पदार्थ मिळतात. वडापाव, चायनीज, आंबोळी, आदी विविध चविष्ठ पदार्थ खाण्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.

पाच वर्षामध्ये वडणगेत एक वेगळा व्यावसायिक दृष्टीकोन तयार झाला आहे. केवळ व्यवसायिक दृष्टीकोन न जपता सेवा, स्वच्छतेसह ग्राहकांसोबत संवादावर भर दिला जात आहे. अनेक युवकांनी आणि उद्योजकांनी हा बदल ओळखून खाद्य संस्कृतीत आपले भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक केंद्रीत व्यवसायाकडे अधिकाधिक भार दिला जात आहे.

सायंकाळी वडणगेत अनेक खाद्यप्रेमी स्टॉल्स्समोर रांगा लावून थांबलेले असतात. विशेष म्हणजे, वडणगेतील खाद्य व्यवसायात स्थानिक महिलांचाही मोठा सहभाग आहे. काही महिलांनी स्वतंत्र स्टॉल्स सुरु करुन ते चवदार पदार्थांची विक्री करतात. यामुळे त्या महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असून त्यांचे सामाजिक स्थानही बळकट झाले आहे.

वडणगेतील व्यावसायिक केवळ पारंपरिक पद्धतीत अडकले नाहीत. तर त्यांनी नवीन कल्पनांचा अवलंब केला आहे. काही स्टॉल्सवर ग्राहकांना आपल्या आवडीनुसार पदार्थांची चव निवडण्याची मुभा दिली आहे. आताच्या इंटरनेट युगात गावातील व्यावसायिक सोशल मीडियाचा वापर करुन आपल्या व्यवसायाचा प्रचार करत आहेत. वडणगेत फुड स्पॉटसाठी इंस्टाग्राम व फेसबुकवर पेजेस चालवली जात आहेत. त्यामुळे युवा वर्गाचा मोठया प्रमाणावर सहभाग वाढला आहे.

वाढत्या खाद्यसंस्कृतीचा परिणाम वडणगेच्या विकासावरही झाला आहे. येथे रोजगाराच्या संधी ही वाढल्या आहेत. अनेक तरुणांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. वाढत्या खाद्य व्यवसायामुळे वडणगेत इतर सेवा क्षेत्रातही विकसीत होत आहेत .जसे की, लग्न सोहळयासाठी लागणारे साहित्य भाडयाने टेबल-खुर्ची देणारेही व्यवसाय वाढले आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article