शिवाजी विद्यापीठात 1 जानेवारीपासून 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा'उपक्रम
कोल्हापूर :
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठात 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठांमध्ये तसेच विविध महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी . विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पुस्तकांचे सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजन, ग्रंथ प्रदर्शन, वाचन संवाद कार्यक्रमांतर्गत लेखकांचा वाचकांशी संवाद इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आधारित निबंध स्पर्धा तसेच कथन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त निबंध अथवा कथन यांना विद्यापीठाच्यावतीने प्रशस्तीपत्रही देण्यात येणार आहे. या उपक्रमापूर्वी सर्व ग्रंथालयांमध्ये स्वच्छता मोहीमही राबवण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 26 जानेवारी रोजी विद्यापीठात होणार आहे. या अभियानात शिवाजी विद्यापीठातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यातील सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली आहे.