चार दिवसांत दीड लाख जनावरांना लसीकरण
बेळगाव : राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांना लाळ्या प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. सोमवारपासून या मोहिमेला प्रारंभ झाला असून चार दिवसांत दीड लाखाहून अधिक जनावरांना लस टोचण्यात आली आहे. लाळ्या विषाणूजन्य रोगाला रोखण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत ही मोहीम हाती घेण्यात आली. विशेषत: म्हैस, बैल, गायी आणि चार महिन्यांवरील वासरांना लस दिली जात आहे. 20 व्या पशुगणतीनुसार जिल्ह्यात 13 लाख 93 हजार 711 मोठी जनावरे आहेत. या सर्व जनावरांना लस टोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यासाठी जिल्ह्यात 1080 जणांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषत: घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जात आहे. पाचव्या टप्प्यात 12 लाख 31 हजार 435 जनावरांचे लसीकरण झाले होते. आता सहाव्या टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी 12 लाख 52 हजार डोस पुरविण्यात आले आहेत. अलीकडे जनावरांना विविध रोगांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसू लागला आहे. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात लम्पीची लागण झालेली जनावरेही आढळून येत आहेत. त्याचबरोबर लाळ्या खुरकतचा धोका टाळण्यासाठी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पशुपालकांमध्ये गैरसमज
लसीकरण मोहिमेला शेतकरी पशुपालकांचे सहकार्य मिळत असले तरी काही पशुपालकांच्या मनामध्ये गैरसमज असल्याने मोहिमेत अडचणी येत आहेत. लसीकरण केल्यानंतर दूध क्षमता कमी होईल? गर्भधारणा झालेल्या जनावरांना लसीकरण करण्यास टाळाटाळ करणे, असे प्रकार घडत आहेत. या गैरसमजुतीमुळे जनावरे लसीकरणापासून वंचित रहात असल्याची खंत पशुवैद्यांनी व्यक्त केली. लसीकरणामुळे दूध क्षमता कमी होत नाही. शिवाय गाभण जनावरालाही लसीकरण करून घेतल्यास कोणताही धोका नाही, असे सांगून जागृती केली जात आहे.
पशुपालकांनो मोहिमेला सहकार्य करा...
लाळ्या खुरकत टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पशुपालकांनी या मोहिमेला सहकार्य करून जनावरांना लस टोचून घ्यावी. या लसीकरणामुळे जनावरे निरोगी आणि सुदृढ राहतील.
- डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन)