जनावरांना लम्पी-लाळ्या प्रतिबंधक लसीकरण
प्रथमच दुहेरी मोहीम, घरोघरी उपक्रम : एकही जनावर वंचित राहणार नाही
बेळगाव : जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी लम्पी आणि लाळ्या-खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला शनिवार दि. 26 पासून प्रारंभ होत आहे. जिल्ह्यात प्रथमच एकाचवेळी दुहेरी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. घरोघरी जाऊन जनावरांना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही मोहीम अधिक सक्रियपणे राबविली जाणार आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी पशुसंगोपन खात्यामार्फत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात 13,93,700 इतकी मोठ्या जनावरांची संख्या आहे. या सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे. तर गोवर्गीय जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस टोचली जाणार आहे. लाळ्या हा संसर्गजन्य रोग असल्याने एका जनावरापांसून दुसऱ्या जनावराला लागण हेते. दरम्यान लागण झालेले जनावर अशक्त बणून दूध क्षमताही कमी होते. यासाठी खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. 6 महिन्यांवरील सर्व गाय-म्हैस, बैल आणि वासरांना लस दिली जाणार आहे. विशेषत: जिल्ह्यात एकाचवेळी लम्पी आणि लाळ्या प्रतिबंधक लसीकरण राबविले जात आहे.
रेबीज प्रतिबंधक लसीकरण
शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे रेबीजचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंगोपन खात्यामार्फत मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण राबविले जात आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पाळीव कुत्र्यांना मोफत लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी आपल्या श्वानांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे.