माजी केंद्रीय मंत्री, भाजप खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचे निधन
हृदयविकाराच्या धक्क्याने प्राणज्योत मालवली
प्रतिनिधी/ बेंगळूर
माजी केंद्रीय मंत्री आणि चामराजनगरचे विद्यमान भाजप खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद (वय 76) यांचे रविवारी मध्यरात्री 1:30 च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. मूत्रपिंडांच्या संसर्गामुळे श्रीनिवास प्रसाद यांना 22 एप्रिल रोजी बेंगळूरमधील मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यलक्ष्मी, मुली प्रतिमा, पूर्णिमा, पूनम, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
रविवारी सकाळी श्रीनिवास प्रसाद यांचे पार्थिव म्हैसूरमधील जयलक्ष्मीपुरम येथील निवासस्थानी आणण्यात आले. दुपारनंतर अशोकपुरम येथील एमटीएम शाळेच्या मैदानावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी म्हैसूरमधील सिल्क फॅक्टरी सर्कलजवळ डॉ. आंबेडकर ट्रस्ट आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1974 मध्ये राजकारणात प्रवेश करणारे श्रीनिवास प्रसाद हे सहावेळा चामराजनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि दोनवेळा नंजनगुडू येथून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एकदा केंद्रीय मंत्री आणि सिद्धरामय्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून काम केले होते.
श्रीनिवास प्रसाद यांनी लोकसभा निवडणूक घोषणेपूर्वी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. 1972 पर्यंत ते जनसंघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. 1973 मध्ये म्हैसूरमधील बुसा चळवळीचे त्यांनी नेतृत्त्व केले होते. 1974 मध्ये म्हैसूरच्या कृष्णराज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तेव्हा रामकृष्ण हेगडे यांनी श्रीनिवास प्रसाद यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यांना पक्षाच्या युवा घटनाचे मुख्य सचिवही बनविण्यात आले.
1975 च्या आणिबाणीविरोधी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आणि जनता पक्षात प्रवेश केला. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 1978 ची विधानसभा निवडणूक टी. नरसीपूरमधून लढविली. त्यातही ते पराभूत झाले. जनता पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत ते चामराजनगर राखीव मतदारसंघातून निवडून आले. नंतर काँग्रेस सोडून संयुक्त जनता दलात प्रवेश करून लोकसभेवर निवडून येत वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले. 2013 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभेवर निवडून येत सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. 2017 मध्ये मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्याने त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. व नंजनगूड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक लढविली पण, त्यांचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळविला होता. जुने म्हैसूर भागातील प्रभावी दलित नेता अशी त्यांची ओळख होती.