इस्रो अध्यक्षपदी व्ही. नारायणन नियुक्त
एस. सोमनाथ यांचा कार्यकाळ 14 जानेवारीला समाप्त होणार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अध्यक्षपदी विख्यात तंत्रज्ञ व्ही. नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चांद्रयान-3 हे अभियान यशस्वी करुन भारताला जगप्रसिद्धी मिळवून दिलेले एस. सोमनाथ यांचा कार्यकाळ 14 जानेवारीला समाप्त होणार आहे. त्यानंतर त्यांच्या स्थानी व्ही. नारायणन हे या संस्थेची सूत्रे हाती घेतील. त्यांच्या नियुक्तीचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
व्ही. नारायणन यांचा कार्यकाल दोन वर्षे किंवा पुढच्या आदेशापर्यंत असेल. त्यांना अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे सचिव ही उत्तरदायित्वेही देण्यात आली आहेत. या संस्थेचे प्रमुखपद मिळाल्यामुळे नारायणन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते आपल्या कार्यकाळात संस्थेची आणखी प्रगती करुन देशाला मोठा मान मिळवून देतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
कोण आहेत व्ही. नारायणन
व्ही. नारायणन हे देशातील सुविख्यात संशोधक आहेत. त्यांच्यापाशी अग्निबाण शास्त्र आणि निर्मितीचा मोठा अनुभव आहे. सध्या ते एलपीएससीचे संचालन आहेत. ही संस्था इस्रो या संस्थेचाच एक महत्वाचा भाग आहे. या संस्थेचे मुख्यालय केरळची राजधानी थिरुवनंतरपुरममध्ये आहे. तसेच या संस्थेची एक शाखा बेंगळूरमध्येही आहे. या संस्थेने इस्रोच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे.
व्ही. नारायणन यांचा अल्पपरिचय
व्ही. नारायणन हे मूळचे तामिळनाडूतील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण तामिळ माध्यमातून झाले आहे. नंतर त्यांनी आयआयटी खरगपूर मध्ये क्रायोजेनिक इंजिन अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी नंतर याच विषयात एम. टेक. आणि एअरोस्पेस अभियांत्रिकी या विषयात पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एम. टेक. शिक्षणक्रमात त्यांनी रजतपदक पटकाविले. ते अग्निबाण आणि अवकाशयान प्रोपल्शन तज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांनी 1984 मध्ये इस्रोमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये ते लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम केंद्राचे संचालक झाले.
आतापर्यंतचे यशस्वी प्रकल्प
व्ही. नारायणन यांच्या नेतृत्वात आतापर्यंत इस्रो या संस्थेने अनेक महत्वाचे प्रकल्प यशस्वी केले आहेत. या प्रकल्पांमध्ये जीएसएलव्ही एमके 3 वाहनाचा सी 25 क्रायोजेनिक इंजिनाचा प्रकल्पही समाविष्ट आहे. ते या प्रकल्पाचे संचालन होते. इस्रोमध्ये सेवा पत्करण्यापूर्वी त्यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात काहीकाळ सेवा केली आहे. या केंद्रात असताना त्यांनी साउंडिंग रॉकेट्स्, ऑगमेंटेड उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा घन इंधननिर्मिती प्रकल्प आणि इतर महत्वाचे प्रकल्पात काम केले आहे. याच केंद्रात त्यांनी विख्यात संशोधक म्हणून ख्याती प्राप्त केली. याशिवाय त्यांनी गगनयान प्रकल्पात मोठी भूमिका साकारली आहे.
चांद्रयान 3 मध्येही मोठे योगदान
भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा आतापर्यंतचा सर्वात प्रतिष्ठेचा प्रकल्प मानल्या गेलेल्या ‘चांद्रयान-3’ या प्रकल्पाच्या यशात नारायणन यांचे मोठे योगदान आहे. या प्रकल्पाच्या क्रायोजेनिक प्रोपल्शन व्यवस्थेच्या विकासात त्यांची भूमिका महत्वाची आहे. ही व्यवस्था विकसीत करणारा भारत हा जगातील सहा देशांमधील एक देश बनला आहे. अशाप्रकारे व्ही. नारायणन यांची कामगिरी मोठी आहे.
कसा होता सोमनाथ यांचा कार्यकाल
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मावळते अध्यक्ष एस. सोमनाथ हे 2022 मध्ये या संस्थेचे प्रमुख बनले होते. त्यांच्या कार्यकाळात भारत चंद्रावर यान उतरविणारा, अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला. तर चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या भागात चांद्रयान यशस्वीरित्या उतरविणारा भारत हा जगातील प्रथम देश बनला. 23 ऑगस्ट 2023 या दिवशी भारताने हा विक्रम केला. यासह एस. सोमनाथ यांच्या कार्यकाळात अनेक देशी आणि विदेशी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. त्यांचा कार्यकाळ देदिप्यमान असा होता.