विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी उझ्बेक, जॉर्डन पहिल्यांदाच पात्र
वृत्तसंस्था /सेऊल
2026 साली होणाऱ्या पुरुषांच्या फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी उझ्बेकीस्तान आणि जॉर्डन यांनी पहिल्यांदाच आपली पात्रता सिद्ध केली आहे तर द. कोरियाने सलग 11 व्यांदा फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे.
2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे तिकीट मिळविण्यासाठी विविध ठिकाणी पात्रतेचे सामने खेळविले जात आहेत. या पात्रतेच्या स्पर्धेतील अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात उझ्बेकने संयुक्त अरब अमिरातला गोलशून्य बरोबरीत रोखत अ गटातून दुसरे स्थान मिळविले. या गटात इराण पहिल्या स्थानावर आहे. पात्रता स्पर्धेतील उझ्बेकचा आणखी एक सामना बाकी आहे. उझ्बेक आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील झालेल्या बरोबरीच्या सामन्यात उझ्बेकचा गोलरक्षक युसुपोव्हने संयुक्त अरब अमिरातचे अनेक हल्ले यशस्वीपणे थोपवित त्यांना शेवटपर्यंत खाते उघडण्यापासून रोखले. अ गटातून उझ्बेकने दुसरे स्थान मिळविल्याने त्यांनी आगामी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. आशिया खंडातून सहा संघ थेट पात्र ठरणार आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि कतार या दोन संघांनी यापूर्वीच आशिया खंडातून आपली पात्रता सिद्ध केली आहे.
कतारने पात्र फेरीच्या सामन्यात इराणचा 1-0 असा पराभव केला. युएई आणि कतार यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळविले असून त्यांनी पुढील टप्प्यासाठी वाटचाल केली आहे. 2026 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी आणखी दोन संघ पात्र ठरणार असून त्या टप्प्यात सहा संघात सामने खेळविले जाणार आहेत.
द.कोरियाचा इराकवर विजय
ब गटातील झालेल्या पात्र फेरी स्पर्धेच्या लढतीत द. कोरियाने इराकचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. द. कोरियातर्फे किम गेयु आणि ओ गेयु यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. अन्य एका सामन्यात जॉर्डनने ओमानचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केल्याने जॉर्डनने आघाडीच्या पहिल्या दोन संघांत स्थान मिळविले आहे. जॉर्डनतर्फे अली ओलवान यांनी तीन गोल केले. अन्य एका सामन्यात पॅलेस्टीन संघाने पात्रतेसाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवताना कुवेतचा 2-0 असा पराभव केला. क गटातील जकार्ता येथे झालेल्या सामन्यात इंडोनेशियाने चीनचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल रोमेनीने केला. या पराभवामुळे चीनला पात्रतेपासून वंचित रहावे लागले. पात्रता स्पर्धेतील अन्य ठिकाणी सुरू असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जपानवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. 2026 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच आपली पात्रता सिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलियाने फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत सलग सहाव्यांदा आपली पात्रता सिद्ध केली आहे. गेल्या 16 वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा जपानवरील हा पहिला विजय आहे.