‘देव‘ घडवणारी उत्तरेश्वर पेठ...
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
देव आहे की नाही, यावर खूप उलट-सुलट चर्चा घडू शकते. पण देवाची प्रतीकात्मक चांदीची मूर्ती मात्र कोल्हापुरातच उत्तरेश्वर पेठेत घडवली जाते. या पेठेत चांदीच्या मूर्ती घडवण्याचा व्यवसाय खूप चांगला रुजला आहे. किंबहुना श्रद्धेने देशभरात घराघरातील देव्हाऱ्यात पुजल्या जाणाऱ्या देव-देवतांच्या चांदीच्या 70 टक्के मूर्ती कोल्हापुरातच तयार झाल्या आहेत. कोणताही कोर्स नाही, तांत्रिक पूर्वज्ञान नाही, पण केवळ एकमेकांचे काम बघून असंख्य तरुण या व्यवसायाचा घटक झाले आहेत. उत्तरेश्वर म्हणजे गणेशोत्सव शिवजयंती, टेंबलाबाईची जत्रा याचा दणदणाट आणि युवकांची मोठी एकजूट म्हणून ओळखली जाते. पण उत्तरेश्वर पेठेची ही चंदेरी ओळख जगासमोर येण्याची गरज खरी गरज आहे.
कोल्हापूरच्या पश्चिम टोकाला असलेली उत्तरेश्वर पेठ म्हणजे कोल्हापूरच्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरांचे प्रतीक. या भागात पूर्वी बहुतेक घरात म्हशी, दुग्ध व्यवसाय व शेती. या पेठेत महादेवाच्या मंदिरात कोल्हापुरातील सर्वात मोठे शिवलिंग. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची या पेठेवर आणि तेथील शिवलिंगावर विशेष अशी श्रद्धा. आजही रानडे विद्यालय या नावाने उत्तरेश्वर पेठेत शाळा आहे.
अशा पेठेत फार जुना नाही, पण 70-80 वर्षांपूर्वी हा चांदीच्या मूर्तीकामाचा व्यवसाय सुरू झाला. कोणतीही व्यावसायिक अडचण येऊ दे, त्यावर डोके लढवून मार्ग काढणारी माणसे येथे ठरलेली. त्यामुळे हा व्यवसाय येथे हळूहळू रुजत गेला आणि आज चांदीच्या मूर्ती व्यवसायात भारतभर जाऊन पोहोचला. येथे चांदीच्या पोकळ आणि भरीव मूर्ती तयार केल्या जातात. मूळ मूर्ती तयार करणे, त्याचा छाप काढणे, चांदीचा पातळ पत्रा तयार करणे, ओतकाम करणे, त्याला जोडणे, नक्षीची सजावट करणे, पॉलिश करणे ही सर्व कामे येथे केली जातात. छोट्या-छोट्या घरात बसून तरुण मुले-मुलीही या कामात सहभागी होतात. इतर सुट्टीच्या दिवशी फुटबॉल मैदान, मिरवणुका, मोर्चा येथे आक्रमक दिसणारे तरुण या चंदेरी नाजूक कामात मात्र स्वत:ला मनापासून झोकून देतात.
आता उत्तरेश्वर पेठेतील दोनशेहून अधिक घरांत हा व्यवसाय केला जातो. पाच ते सहा हजार जणांना या व्यवसायाने आधार दिला आहे. गणपती, लक्ष्मी, साईबाबा, खंडोबा, जोतिबा, स्वामी समर्थ, शिवाजी महाराज, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान या मूर्ती व विशेषत: कर्नाटकासाठी देवीचे मुखवटे तयार केला जातात. एका-एका टप्प्यातून मूर्ती घडत-घडत पुढे जाते आणि श्रद्धेपोटी कोणाच्या तरी घरातील देव्हाऱ्यात जाऊन बसते. कुटुंबातील खूप भावभावनांशी ही मूर्ती जोडली जाते. देशातील व्यापारी यासाठी कोल्हापूरशी संपर्क साधतात. मूर्ती तयार करून घेतात. याच मूर्ती देशभरातील मोठमोठ्या शहरांतील शोरूममध्ये लखलखत आणि झळकत असतात .
कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेत या चांदीच्या मूर्तींनी अनेकांना जगण्याचा आधार दिला आहे. पोरगं फारसं शिकलं नाही किंवा शिकूनही नोकरी लागली नाही तर ‘बस कामाला..’ एवढ्या दोन शब्दांवर त्याला बऱ्यापैकी आधार मिळत आहे. तो काही ना काही मिळवून स्वत:च्या खर्चाची तरी जबाबदारी पेलू शकत आहे.
कोल्हापूरची ओळख कोल्हापुरी परंपरा कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापूरचा फुटबॉल अशा विविध अंगाने आहे. पण कोल्हापूर आणि चांदीच्या मूर्ती याची अगदी जाणीवपूर्वक ओळख करून देण्याची गरज आहे. पूर्वी उत्तरेश्वर पेठेपुरता मर्यादित असलेला हाच हस्त व्यवसाय आता आजूबाजूच्या उपनगरात पसरला आहे आणि देव असो किंवा नसो तो चांदीच्या मूर्तीच्या निमित्ताने मात्र येथील उत्तरेश्वर पेठेचा कायमचा आधार राहणार आहे.
- कोल्हापूरचे पाणी..
चांदीच्या मूर्ती पॉलिश करण्यासाठी कोल्हापूरच्या पाण्याची एक वेगळी ओळख आहे. या पाण्यात काहीतरी घटक असा आहे की पॉलिशला खूप चांगली झळाळी येते. पॉलिश खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे चांदी व्यवसायात येथील पाण्यालाही वेगळे महत्त्व आहे.
- कुटुंबांना आधार
चांदीच्या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात कोल्हापूरने आणि विशेषत: उत्तरेश्वर पेठेने देशभरात आपले नाव कमवले आहे. हा व्यवसाय येथील अनेक कुटुंबांचा आधार आहे.
-सुजीत (बंडा) पोवार, मूर्ती कारागिर
- देशभरात पेठेचे नाव
पेठेतील चांदी व्यवसायाने देशभरात उत्तरेश्वर पेठेचे नाव जाऊन पोहोचले आहे. कोणतेही फारसे तांत्रिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण न घेता येथील तरुणांनी केवळ आपल्या कौशल्यावर हा व्यवसाय स्थिर केला आहे.
- अर्जुन वीर, चांदी मूर्ती व्यावसायिक