उत्तराखंड : युसीसी प्रशिक्षणास प्रारंभ
लिव्ह इन रिलेशनशिपचीही नोंदणी करावी लागणार
वृत्तसंस्था / डेहराडून
उत्तराखंड राज्यात समान नागरी संहिता आणि तिचे नियम यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. प्रशासनाने आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना समान नागरी संहितेचे नियम आणि त्यांचे पालन यांचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. येत्या 26 जानेवारीपासून या राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यात येत आहे.
या संहितेचे नियम मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जोडप्यांनाही विवाहितांप्रमाणे आपल्या संबंधाची नोंदणी करावी लागणार आहे. तसेच अशा जोडप्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
विवाह नोंदणी अनिवार्य
राज्यातील सर्व विवाहांची नोंदणी करणे यापुढे अनिवार्य केले जाणार आहे. विवाहाप्रमाणेच घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप भंग, इच्छापत्राद्वारे मालमत्ता वितरण, कायदेशीर वारसदारांची घोषणा, तसेच वारसाअधिकारांसंबंधातील न्यायालयीन प्रकरणे, आदी सर्व विषयांवर नियम करण्यात आले आहेत. सर्वधर्मिय नागरीकांना हे नियम लागू केले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
त्र्ययस्थालाही तक्रार करण्याचा अधिकार
एखाद्या विवाहासंबंधी त्र्ययस्थ व्यक्तीची तक्रार असेल तर त्याला ती सादर करण्याचा अधिकार मिळणार आहे. या तक्रारीच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्याचे उत्तरदायित्व नोंदणीउपाधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. तक्रारदार व्यक्तीने स्वत:ची नोंदणी या संबंधीच्या पोर्टलवर करावयाची आहे. खोट्या तक्रारी सादर करणे किंवा अफवा यांच्यावर नियंत्रणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
लिव्ह इन रिलेशनशीप नोंदणी
लिव्ह इन रिलेशनशीपची नोंदणी विवाहसदृश पद्धतीने करणे, हे या समान नागरी संहितेचे वैशिष्ट्या मानले जात आहे. या नोंदणीत जोडप्यातील प्रत्येकाची नावे, वय, पालकांची नावे, धर्म, यापूर्वीची रिलेशनशिप आणि दूरध्वनी क्रमांक इत्यादी माहिती पोर्टलवर नोंद करावी लागणार आहे. नेंदणी पद्धतीने विवाह करतानाही अशाच प्रकारची माहिती द्यावी लागते. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिप यांना समान पातळीवर मानण्यात आले आहे.
दोन प्रकरांची नेंदणी
लिव्ह इन रिलेशनशिपचे दोन प्रकार करण्यात आले आहेत. जे जोडपे राज्यातीलच आहे, त्यांची नोंदणी केली जाणार आहे. तर भारतातील इतर राज्यांमधील लिव्ह इन जोडपी उत्तरखंडमध्ये वास्तव्यास असतील, तर त्यांनाही नोंदणी करावी लागणार आहे. लिव्ह इन संबंधातून अपत्यप्राप्ती झाल्यास अपत्याला जन्मप्रमाणपत्र मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य ठरविण्यात आलेले आहे. लिव्ह इन संबंधांमधील पार्टनर्सना त्यांची छायाचित्रेही अपलोड करावी लागणार आहे, अशीही माहिती देण्यात आली.
मृत्यूपत्रासंबंधी नियम
मृत्यूपक्ष किंवा इच्छापत्र यांच्यासंबंधीही सर्वांना लागू होतील असे नवे नियम प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नियमांच्या अनुसार इच्छापत्र करणाऱ्यांने त्याची स्वत:ची आणि त्याच्या सर्व वारसदारांची माहिती पोर्टलवर नोंद केली पाहिजे. आधार कार्ड क्रमांकही नोंद केला पाहिजे. इच्छापत्राच्या साक्षीदारांची माहिती आणि इच्छापत्राची त्यांच्यासमोरचे वाचन यांचाही व्हिडीओ अपलोड करण्याचा नियम करण्यात आला आहे. या सर्व तरतुदी फसवणूक टाळण्यासाठी केलेल्या आहेत.
राज्यस्तरीय साहाय्यता केंद्रे
समान नागरी संहिता आणि तिचे नियम समजून घेणे लोकांना सुलभ व्हावे, म्हणून राज्य सरकारने तीन साहाय्यता केंद्रेही स्थापन केली आहेत. तर राज्याच्या महिती तंत्रज्ञान विभागानेही तांत्रिक सहकार्य देण्यासाठी कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष लोकांना समान नागरी संहिता आणि तिचे नियम, तसेच तांत्रिक माहिती देणार आहे. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावून देण्यासाठीही या कक्षात तज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.