उत्तराखंडचा क्रिकेटपटू राजन कुमार डोप चाचणीत दोषी
तामिळनाडूची धावपटू धनलक्ष्मीवर 8 वर्षांची बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एका दुर्मिळ घटनेत उत्तराखंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज राजन कुमार डोप चाचणीत अपयशी ठरला असून राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने (नाडा) त्याच्यावर तात्पुरती बंदी घातली आहे.
29 वर्षीय कुमारच्या डोप नमुन्यात अॅनाबॉलिक स्टेरॉइड्स ड्रोस्टॅनोन आणि मेटेनोन तसेच क्लोमिफीन हे रसायन आढळले आहे. क्लोमिफीनचा वापर सामान्यत: महिलांमधील वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी औषध म्हणून केला जातो, परंतु पुऊषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी पूर्ववत करण्याची क्षमता देखील त्यात आहे. कुमार शेवटचा 8 डिसेंबर, 2025 रोजी अहमदाबादमध्ये उत्तराखंडच्या सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतील गट ‘ड’ सामन्यात दिल्लीविऊद्ध खेळला होता.
क्रिकेटपटू डोप चाचणीत अपयशी होण्याची घटना दुर्मिळ आहे. 2020 मध्ये मध्यप्रदेशचा अष्टपैलू खेळाडू अंशुल राव डोपिंगमध्ये दोषी आढळला होता, तर 2019 मध्ये पृथ्वी शॉ डोप चाचणीत अपयशी झाला होता. नोंगमैथेम रतनबाला देवी ही देखील डोप चाचणीत अपयशी ठरलेल्या दुर्मिळ फुटबॉलपटूंपैकी एक असून तात्पुरती बंदी घालण्यात आलेल्या खेळाडूंच्या सुधारित यादीत तिचे नाव समाविष्ट आहे. तिच्या नमुन्यात अॅनाबॉलिक स्टेरॉइड मेटॅन्डिएनोन आढळले. या यादीतील इतर खेळाडूंमध्ये गौरव पटेल (अॅथलेटिक्स), खुशबू कुमारी (वेटलिफ्टिंग), अचलवीर करवासरा (बॉक्सिंग) आणि सिद्धांत शर्मा (पोलो) यांचा समावेश आहे.
तामिळनाडूची धावपटू धनलक्ष्मी शेखर, जी गेल्या वर्षी आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा डोप चाचणीत अपयशी झाली होती, तिच्यावर 9 सप्टेंबर, 2025 पासून आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. सप्टेंबर, 2025 मध्ये तिची डोप चाचणी पॉझिटिव्ह आली होती, ज्यात तिच्या नमुन्यात अॅनाबॉलिक स्टेरॉइड ड्रोस्टॅनोन आढळले होते. हा तिचा दुसरा डोपिंग गुन्हा आहे. 27 वर्षीय धनलक्ष्मी 2022 मधील डोपिंग गुह्यासाठी तीन वर्षांच्या बंदीला तोंड द्यावे लागल्यानंतर 2025 मध्ये पुन्हा मैदानात परतली होती.