उत्तर प्रदेशाची मतदारसूची प्रसिद्ध
अस्थायी सूचीतून वगळले 2.89 कोटी मतदार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशची अस्थायी मतदारसूची केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या सूचीतून 2 कोटी 89 लाख नावे वगळण्यात आली आहेत. विविध कारणांसाठी ही नावे वगळण्यात आली असून आयोगाने ही कारणेही स्पष्ट केली आहेत. अशा प्रकारे उत्तर प्रदेश या भारतातील सर्वात मोठ्या राज्यात ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षणा’चा (एसआयआर) प्रथम टप्पा आयोगाने पार केला आहे.
एसआयआर होण्यापूर्वी उत्तर प्रदेशात मतदारांची संख्या 15 कोटी 44 लाख इतकी होती. आता नव्या सूचीत ती 12 कोटी 55 लाख इतकी दाखविण्यात आली आहे. वगळलेल्या नावांमध्ये 46.23 लाख मृत मतदारांचा समावेश आहे. तर 2 कोटी 17 लाख मतदारांनी त्यांचे वास्तव्य स्थान सोडल्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच 25 लाख 47 हजार मतदारांकडे एकाहून अधिक मतदार ओळखपत्रे असल्याचे दिसून आले आहे. ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना आणखी एक महिन्यापर्यंत त्यांची नावे पुन्हा मतदारसूचीत समाविष्ट करण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी नव्याने अर्ज करावा लागणार असून त्यांना कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत, अशी माहिती दिली गेली.
लखनौचा क्रमांक प्रथम
केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात किती मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, याची माहितीही प्रसिद्ध केली आहे. नावे वगळण्याच्या संदर्भात लखनौ जिल्ह्याचा क्रमांक सर्वात वरचा आहे. या राजधानीच्या जिल्ह्यात एकंदर 12 लाख नावे वगळण्यात आली आहे. ही संख्या या जिल्ह्यातील एकंदर मतदार संख्येच्या 30 टक्के आहे. तर ललितपूर जिल्ह्यात वगळलेल्या मतदारांची संख्या सर्वात कमी, म्हणजे 95 हजार 450 (9.96 टक्के) इतकी आहे. याखेरीज बलरामपूर (25.98 टक्के), हापूर (22.30 टक्के), संभल (20 टक्के) असे अन्य काही जिल्ह्यांमध्ये वगळलेल्या मतदारांचे प्रमाण आहे.
शहरी भागात अधिक काटछाट
शहरी भागांमध्ये मतदारांची नावे वगळली जाण्याचे प्रमाण मोठे आहे. स्थलांतर, मतदारांकडून असहकार्य आणि एकाहून अधिक मतदार ओळखपत्रे असणे, या कारणांमुळे शहरांमधून अधिक मतदार वगळले गेले आहेत. मात्र, जे खरे मतदार असूनही ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना येत्या 30 दिवसांमध्ये पुन्हा आपली नावे समाविष्ट करण्याची संधी मिळेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
6 फेब्रुवारीपर्यंत कालावधी
6 जानेवारीला मतदारांची अस्थायी सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत मतदार निवडणूक आयोगाकडे मतदारसूचीत प्रवेशासाठी अर्ज करु शकणार आहेत. तसेच आक्षेप घेण्यासाठीही हाच कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर निवडणूक आयोग आक्षेप आणि अर्ज यांची छाननी करणार असून अंतिम मतदारसूची 6 मार्च या दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या नागरीकांचा जन्म 1 जानेवारी 2008 च्या पूर्वी झालेला आहे, त्या सर्व नागरीकांना मतदारसूचीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल, अशी सूचना आयोगाने केली आहे. वगळलेल्या नावांच्या मतदारांना त्यांच्या नावांचा समावेश करण्यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरुन द्यावा लागणार आहे, अशीही माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.