उत्तरप्रदेशचे मंत्री खटीक यांचा राजीनामा
आणखी एक मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या कार्यपद्धतीवर नाराज
वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेशचे जलशक्ती राज्यमंत्री असलेले दिनेश खटीक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दलित आणि मागास वर्गाचे कल्याण करण्यासाठी सरकारमध्ये सामील झालो होतो. परंतु या सरकारच्या कार्यकाळात या दोन्ही समुदायांची उपेक्षा होत आहे. दलित तसेच मागासवर्गीयांचा अपमान होतोय. दलित समुदायाशी संबंधित असल्याने माझ्या आदेशावर कुठलीच कार्यवाही केली जात नाही. याचमुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे दिनेश खटीक यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशात सध्या बदली प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेवरून काही विभागांमध्ये खळबळ उडाली आहे. याचदरम्यान जलशक्ती विभागातील चढाओढही समोर आली आहे. दिनेश खटीक हे विभागीय अधिकाऱयांकडून उपेक्षा केली जात नसल्याने नाराज होते. वरिष्ठ मंत्र्यासोबत अधिकारांच्या कक्षेवरूनही त्यांचा वाद होता असे समजते. मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातून सलग दुसऱयावेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिनेश खटीक यांना राज्यमंत्री करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशात बदली प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट हस्तक्षेप करत कठोर पाऊल उचलले होते. परंतु आता हा वाद अधिकच वाढला आहे. या वादादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद हे मंगळवारी रात्री दिल्लीत पोहोचले. बुधवारी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांची भेट घेतल्याचे समजते. उत्तरप्रदेशात सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमधील कथित अनियमिततेवरून प्रसाद यांनी स्वतःची भूमिका मांडली आहे.
जितिन प्रसाद यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य देखील दिल्लीत पोहोचले आहेत. मौर्य यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. उत्तरप्रदेशातील बदली प्रक्रियेसंबंधीच्या वादावर कठोर कारवाई करत मुख्यमंत्री योगी यांनी तीन अधिकाऱयांना निलंबित केले आहे. जितिन प्रसाद यांचे ओएसडी अनिल कुमार पांडे यांच्यावर योगींनी कारवाई केली आहे. यामुळे प्रसाद हे चांगलेच दुखावले गेले आहेत.