For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, कर्नाटक संघ विजयी

10:40 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्रदेश  जम्मू काश्मीर  राजस्थान  कर्नाटक संघ विजयी
Advertisement

राष्ट्रीय महिला ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : भारतीय फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, कर्नाटक फुटबॉल संघटना व बेळगाव जिल्हा बेळगाव फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून उत्तरप्रदेशने चंदीगडचा, जम्मू काश्मीरने अंदमान-निकोबारचा, कर्नाटकाने अंदमान-निकोबारचा तर राजस्थानने महाराष्ट्राचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. कर्नाटकाच्या मैत्रेईने 6 गोल करुन दुसरी हॅट्ट्रीक मिळविली. लव्हडेल स्कूलच्या मैदानावरती सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सकाळी खेळविण्यात आलेल्या उत्तरप्रदेशने चंदिगडचा 10-0 असा पराभव केला. या सामन्यात अचल पटेलने 4, कुमारी कोमलने 3, शबाना, खुशी राय यांनी प्रत्येकी 1 तर चंदिगडच्या एका खेळाडूने स्वयंचित गोल केला. या सामन्यात मात्र चंदीगड संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात जम्मू काश्मीरने अंदमान-निकोबारचा 8-0 असा पराभव केला. या सामन्यात अतिरा, प्राची शर्मा व मनीषा यांनी प्रत्येकी 2 तर जिनब बिलाल, काबारी शर्मा यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसबीजी शिक्षण संस्थेचे शाम घाटगे यांच्या हस्ते दोन्ही संघाच्याखेळाडूंची ओळख करुन सामन्याला सुरूवात करण्यात आली. तिसऱ्या सामन्यात राजस्थानने महाराष्ट्राचा अटितटीच्या लढतीत 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 72 व्या मिनीटाला राजस्थानच्या संजू कनवारने बचाव फळीला चकवत गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महाराष्ट्र संघाने गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण राजस्थानच्या भक्कम बचाव फळीमुळे त्यांना अपयश आले. चौथ्या सामन्यात कर्नाटका संघाने अंदमान-निकोबारचा 21-0 असा एकतर्फी पराभव केला. पहिल्या सत्रात कर्नाटकाने 12 तर दुसऱ्या सत्रात 9 गोल केले. कर्नाटकातर्फे मैत्रेई पालासुंदरमने सलग 6 गोल करुन स्पर्धेतील दुसरी हॅटट्रीक नोंदविली. तर रिना जेकब व तन्वी नायर आणि रितू श्रीनंदन यांनी प्रत्येकी 3, अद्विका कानोजीया, एच. याशीका यांनी प्रत्येकी 2 तर मेधा गुप्ता व अनया थॉमस यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.