For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्रदेश उपांत्यपूर्व फेरीत

06:29 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्रदेश उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / राजकोट

Advertisement

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या महत्त्वाच्या ब गटातील सामन्यात उत्तरप्रदेशने विदर्भचा 54 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात उत्तरप्रदेश संघातील अभिषेक गोस्वामीने दमदार शतक झळकविले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तरप्रदेशने 50 षटकांत 5 बाद 339 धावा झळकविल्या. गोस्वामीने 103 धावा जमविल्या. प्रियाम गर्गने 67, ध्रुव जुरेलने 56 तर रिंकू सिंगने 57 धावा जमविल्या. विदर्भतर्फे हर्ष दुबेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विदर्भने 50 षटकांत 9 बाद 285 धावा जमविल्या. विदर्भतर्फे अमन मोखाडेने केलेली 147 धावांची शतकी खेळी वाया गेली. उत्तरप्रदेशतर्फे कुलदीप यादवने 52 धावांत 3 गडी बाद केले. या विजयामुळे उत्तरप्रदेशने ब गटात 20 गुणांसह आघाडीचे स्थान घेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता या गटात विदर्भ, बंगाल आणि बडोदा या संघांनी पत्येकी समान 16 गुण मिळविले असून त्यांच्यात उपांत्यपूर्व फेरीसाठी चुरस राहील.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: उत्तरप्रदेश 50 षटकांत 5 बाद 339 (अभिषेक गोस्वामी 103), विदर्भ 50 षटकांत 9 बाद 285 (अमन मोखाडे 147, कुलदीप यादव 3-52),

अमन रावचे द्विशतक

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील खेळविण्यात आलेल्या अन्य एका सामन्यात हैदराबादने बंगालचा 107 धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबाद संघातील अमेरिकेत जन्मलेल्या अमनरावने दमदार फलंदाजी करताना 13 षटकार आणि 12 चौकारांसह 109 चेंडूत नाबाद 200 धावा झोडपल्या. बंगालच्या मोहम्मद शमीने 70 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर बंगालचा डाव 44.4 षटकांत 245 धावांत आटोपला. बंगाल संघातील शाहबाज अहमदने 108 धावा झोडपल्या. उत्तरप्रदेशतर्फे मोहम्मद सिराजने 58 धावांत 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: हैदराबाद 50 षटकांत 5 बाद 352 (अमन राव नाबाद 200, शमी 3-70), बंगाल 44.4 षटकांत सर्वबाद 245 (शाहबाज अहमद 108, मोहम्मद सिराज 4-58).

मनन होरा आणि अर्जुन आझाद यांच्या दमदार शतकांच्या जोरावर चंदीगडने आसामचा 7 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात चंदीगडच्या मनन होराने 102 तर अर्जुन आझादने 140 धावांची खेळी केली. आसामने 50 षटकांत 7 बाद 284 धावा जमविल्या.

विष्णू सोळंखी आणि प्रियांश मोलिया यांच्या दमदार शतकांच्या जोरावर बडोदा संघाने जम्मू काश्मिरचा 76 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाचा डाव 332 धावांत आटोपला. त्यानंतर जम्मू काश्मीरने 45.3 षटकांत 256 धावा जमविल्या. बडोदा संघातर्फे विष्णू सोळंखीने 132 तर मोलियाने 114 धावा जमविल्या. जम्मू काश्मीरच्या डावात दिक्षांत कुंडलने 66 तर कवलप्रित सिंगने 65 धावा जमविल्या. या विजयामुळे बडोदा संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 16 गुण घेतले आहेत.

Advertisement
Tags :

.