कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर प्रदेश : विजयासाठी आवश्यक राज्य

06:22 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हणण्याचा प्रघात आहे. याचे कारण, या राज्यात लोकसभेच्या 80 जागा आहेत. हे प्रमाण एकंदर 543 जागांच्या साधारणत: 15 टक्के इतके आहे. त्यामुळे या राज्यात चांगली कामगिरी केल्याशिवाय लोकसभेत बहुमत मिळविण्याचा मार्ग सुकर होत नाही, असा आजवरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीतील अनुभव आहे. प्रचंड लोकसंख्या, विविध जातींचा प्रभाव, धर्माचे प्राबल्य अशा अनेक सामाजिक वैशिष्ट्यांचे हे राज्य आहे. या राज्याला राजकीय चळवळी आणि चढउतारांचा मोठा इतिहास आहे. अनेक प्रसिद्ध राजकारण्यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या राज्याचे राजकीय महत्व सर्वाधिक असल्याने या राज्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्व मोठ्या पक्षांमध्ये मोठी स्पर्धा असते. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेले हे राज्य, नंतरच्या काळात प्रादेशिक पक्षांच्या आणि त्यांच्या जोडीने भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहे. हे राज्य भारतीय राजकारणचा जणू आरसा आहे, असे बोलले जाते. या राज्यात जे राजकीय वातावरण असते, त्याचे पडसाद त्याच्या नजीकच्या राज्यांमध्ये तर उमटतातच, पण दूरच्या राज्यांमध्येही दिसून येतात. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये या राज्याने भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यामुळे बहुमताची संख्या या पक्षाला पार करता आली. यंदाही सत्ताधारी पक्ष हे राज्य आपलेसे करण्यासाठी जोरदार सज्जता करीत असून, त्याला रोखण्यासाठी विरोधकही प्रयत्नशील आहेत. या राज्याच्या विविध भागांमध्ये राजकीय स्थिती कशी आहे, याचा हा आढावा...

Advertisement

Advertisement

  1     संस्थानिकांचा प्रदेश

 

?         स्वातंत्र्यपूर्व काळात हा अनेक संस्थानांचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता. ब्रिटीशांविरोधातील प्रथम स्वातंत्र्यसमर म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, तो 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम याच राज्यातील होता. तो अयशस्वी ठरला. तथापि, नंतरच्या स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या संघर्षातही या राज्याची महत्वाची भूमिका होती.

?         स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही काळ या प्रदेशातील सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. त्यानंतर याचे नाव संयुक्त प्रांत (युनायटेट प्रॉव्हिन्स) असे ठेवण्यात आले. याच संयुक्त प्रांताचे पुढे उत्तर प्रदेश असे नामकरण झाले. तेव्हापासून भारताच्या लोकशाहीत हे राज्य निर्णायक भूमिका साकारत आहे.

 

   2     सामाजिक जडणघडण

 

?         विविध जातींचा प्रभाव येथे प्रारंभापासूनच आहे. सामाजिकदृष्ट्या अन्य मागासवर्ग, दलित, सवर्ण आणि मुस्लीम असे चार मोठे वर्ग येथे आहेत. मागासवर्ग 40 ते 42 टक्के, सवर्ण 18 ते 20 टक्के, दलित 20 टक्के आणि मुस्लीम 20 टक्के अशी सर्वसाधारण समाजरचना आहे. या प्रत्येक वर्गात विविध जाती असून त्यांचे प्रमाण या राज्याच्या प्रत्येक भागात कमी-अधिक असल्याचे दिसून येते.

  3     भूराजकीय विभागणी

?         या राज्याची पश्चिम उत्तरप्रदेश, रोहिलखंड, आंतर्वेदीमधील प्रदेश (गंगा आणि यमुना या नद्यांमधील प्रदेश, मध्य उत्तरप्रदेश, पूर्वांचल आणि बुंदेलखंड असे सहा भाग मानण्यात आलेले आहेत. या प्रत्येक भागात राजकीय समीकरणे वेगवेगळी असू शकतात. तसेच प्रभावी समाजघटकही प्रत्येक भागांमध्ये भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना येथे त्यानुसार आपली धोरणे निर्धारित करावी लागतात.

?         पश्चिम उत्तर प्रदेश जाट भूमी म्हणूनही ओळखला जातो. कारण येथे या समुदायाची संख्या लक्षणीय आहे. तसेच मुस्लीमांची संख्याही पश्चिम उत्तर प्रदेश आणि रोहिल खंड येथे मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही प्रदेशांमध्ये या दोन समाजांचा निवडणुकांवर प्रभाव असतो. पश्चिम उत्तर प्रदेश सुपिक असून गव्हाच्या पट्ट्यात त्याचा समावेश होतो. ऊसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

?         आंतर्वेदीतील प्रदेशात पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य उत्तर प्रदेशातील काही भाग येतो. येथे अन्य मागासवर्गिय, रजपूत, काही प्रमाणात ब्राम्हण, दलित इत्यादी समाजघटकांचे वर्चस्व आहे. येथे मुस्लीमांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. मध्य उत्तर प्रदेश ही यादव भूमी म्हणून परिचित आहे. तेथील काही मतदारसंघांमध्ये या समाजाचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे येथील समीकरणे तुलनेने वेगळी असतात.

?         बुंदेलखंड भाग या राज्याच्या दक्षिणेला असून तो मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड भागाला लागून आहे. हा तुलनेने कमी लोकवस्तीचा प्रदेश आहे. तसेच पाणीटंचाईचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. पूर्वांचल भागात अन्य मागासवर्गीय, दलित आणि सवर्णांचे वर्चस्व आहे. येथे मुस्लीमांची संख्या काही मतदारसंघ वगळता फारशी नाही. त्यामुळे येथेही वातावरण अन्य भागांपेक्षा वेगळे असू शकते.

 4    जातींप्रमाणे धर्माचाही प्रभाव

?         या राज्यात जातींप्रमाणे धर्माचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ‘श्रीरामजन्मभूमी“ आंदोलनाचा प्रारंभ याच राज्यात झाला. आज अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी भगवान रामलल्लांचे भव्य मंदीर साकारले जात असून 22 जानेवारीला या मंदीराच्या गर्भगृहात श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झालेली आहे. रामजन्मभूमी आंदोलनापासून या राज्यातच नव्हे, तर संपूर्ण उत्तर भारतात हिंदू धर्माचा प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे.

?         निवडणुकांच्या काळात किंवा इतरही काळांमध्ये जातींच्या आधारावर मतांचे ध्रूवीकरण या राज्याला नवीन नाही. ‘जात“ हा या राज्यातील अनेक प्रादेशिक पक्षांचा प्रमुख आधारस्तंभ आहे. मात्र, 80 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ‘धर्म“ हा सुद्धा राजकारणावर परिणाम करणारा प्रमुख घटक म्हणून समोर आला आहे. हिंदू धर्मातील विविध जातींना एकत्र हिंदुत्वाच्या छत्रातळी एकत्र आणल्याने भारतीय जनता पक्ष येथे मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

5     प्रमुख मुद्दे कोणते...

?         गरीबी हा या राज्यातील प्रमुख मुद्दा गेल्या 70 वर्षांपासून आहे. यामुळे या राज्यातील कोट्यावधी लोक रोजगाच्या शोधार्थ भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहचलेले आहेत. काही राज्यांमध्ये या लोकांना स्थानिकांकडून विरोधही केला जातो. बेरोजगारीचा मुद्दाही अनेक दशकांपासूनचा आहे. तथापि, या मुद्द्यांचा मतदानावर अधिक प्रभाव जाणवत नाही. मतदानाच्या दृष्टीने धर्म आणि जात हे प्रमुख मुद्दे मानले जातात. जात हा प्रमुख मुद्दा प्रारंभापासूनच आहे. नंतरच्या काळात धर्माच्या आधारावर मतदारांचे ध्रूवीकरण होण्याची प्रक्रिया येथे होताना दिसते.

? अयोध्येतील रामजन्मभूमीवर साकारत असलेले भव्य श्रीराममंदीर हा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे हिंदूचे पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या काशी क्षेत्राचा विकासही मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षांमध्ये झाला आहे. कृष्णजन्मभूमी मथुरेचा प्रश्नही सुटू शकतो. हे मुद्दे निवडणुकीत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने धार्मिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. या योजनेचा प्रांरभ उत्तर प्रदेशातूनच झालेला आहे. या योजनेमुळे उत्तर प्रदेशच्या आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला असून लोकांचा पाठिंबा आहे.

 6    गेल्या चार निवडणुकांमध्ये...

?         केंद्रात जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार आले आहे, तेव्हा उत्तर प्रदेशची भूमिका त्यात महत्वाची राहिली आहे. मात्र, 2004 आणि 2009 या दोन निवडणुकांमध्ये या राज्याने भारतीय जनता पक्षाला अतिशय कमी प्रतिसाद दिला. त्यामुळे सरकारस्थापना शक्य झाली नाही. 1991 मध्ये या राज्यात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार निवडून आले होते. पण नंतरच्या काळात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदल आदी प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला आणि भारतीय जनता पक्ष मागे पडल्याचे दिसून आले.

?         तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात जणू ‘हनुमान उडी“ घेतली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 80 पैकी 71 जागा मिळाल्या. तर मित्रपक्षांना 2 जागा मिळाल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी युती केली. हे दोन्ही पक्ष प्रबळ असल्याने भारतीय जनता पक्षाची डाळ शिजणार नाही, असे बोलले जात होते. तथापि, त्याही निवडणुकीत या पक्षाने 62 जागांचे मोठे यश मिळविले.

यंदा काय घडू शकेल...

?         या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच मोठे यश मिळू शकेल, असा निष्कर्ष अनेक मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये काढण्यात आला आहे. मात्र, काही विश्लेषकांच्या मते काही जागांवर भारतीय जनता पक्षाला विरोधकांशी चुरशीचा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

?         आतापर्यंत मतदानाच्या दोन टप्प्यांमध्ये 80 पैकी 16 जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या राज्यात सर्व सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे चुरस अखेरपर्यंत टिकून राहू शकते. अद्याप अनेक मतदारसंघांमधील उमेदवार घोषित झालेले नाहीत. तरीही सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण दिसते.

?         यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने युती केली असून काँग्रेसला 17 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र राष्ट्रीय लोकदल हा पक्ष विरोधकांच्या आघाडीतून बाहेर पडला आणि त्याने सत्ताधाऱ्यांशी युती केली. बडे नेतेही विरोधी आघाडीतून बाहेर पडल्याने सत्ताधाऱ्यांची स्थिती सुखावह असल्याचे दिसून येते.

?         राज्यात सध्या प्रचाराचा धडाका लागलेला आहे. निवडणूक थेट सातव्या टप्प्यापर्यंत चालणार असल्याने कोणताही विश्लेषक आत्ताच नेमके अनुमान काढण्याच्या परिस्थितीत नाही. तथापि, फार मोठे आश्चर्य घडणार नाही, असेच साधारणत: मत दिसून येते. अर्थात, खरे चित्र 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.

चार निवडणुकांमधील पक्षीय बलाबल

एकंदर जागा 80

2004 : भारतीय जनता पक्ष 10, काँग्रेस 9, इतर 61

2009 : भारतीय जनता पक्ष 10, काँग्रेस 21, इतर 49

2014 : भारतीय जनता पक्ष 72, काँग्रेस 2, इतर 6

2019 : भारतीय जनता पक्ष 62, काँग्रेस 1, इतर 17

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article