For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तम पार्सेकर पेडणेतून उतरणार निवडणूक रिंगणात

01:13 PM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तम पार्सेकर पेडणेतून उतरणार निवडणूक रिंगणात
Advertisement

अनेकांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ: पेडणे सेवा ट्रस्टमार्फत कार्य सुरु

Advertisement

पेडणे : पेडणे या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुकांची नामावली वाढत असून त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मुख्य प्रधान अभियंते उत्तम पार्सेकर यांचीही भर पडली आहे. पार्सेकर यांनी त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी पेडणे मतदारसंघाचा दौरा सुरु केला आहे. ‘पेडणेची सेवा’ हा ट्रस्ट स्थापन करून या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे तसेच लोकांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले असल्याचे पार्सेकर यांनी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. मात्र कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवणार की अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार? याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

युवकांना रोजगार देणार

Advertisement

पेडणे मतदारसंघातील अनेक राष्ट्रीय प्रकल्प आले आणि त्यासाठी जमिनदारांनी, शेतकऱ्यांनी त्याग केला. परंतु त्यांना अजूनपर्यंत मोबदला, रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत. पेडणेतील युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी सरकारकडे आपले प्रयत्न असतील, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

‘पेडणे सेवा’ ट्रस्टची स्थापना

पेडणे सेवा या ट्रस्टमार्फत आरोग्य, शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात पायाभूत कार्य करणार आहे, असे पार्सेकर यांनी काल सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत पेडणे सेवा ट्रस्टचे खजिनदार गुऊनाथ पाताडे, सचिव निवृत्ती पार्सेकर, सल्लागार धनंजय रेडकर, सल्लागार गोपाळ पार्सेकर उपस्थित होते.

पेडणेत दौरा सुरु

उत्तम पार्सेकर यांनी सांगितले की, आपण पेडणे मतदारसंघाचा दौरा सुरु केला आहे. आपणास लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळी अनेकांनी आपणास निवडणूक लढवण्याची विनंती केली, तिचा आपण विचार करणार आहे.

पेडणेच्या विकासासाठी कार्यरत

उत्तम पार्सेकर पुढे म्हणाले की पेडणे मतदारसंघात भूतकाळात विकास कसा झाला? वर्तमान काळात विकास होतोय? आणि भविष्यकाळातही विकासाला कशा पद्धतीने गती द्यायचे, यासाठी पेडणे सेवा ट्रस्ट सदोदित कार्यरत राहणार आहे. पेडणे सेवा ट्रस्टचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच आम्हाला सहकार्य करावे, असेही पार्सेकर म्हणाले. जनतेने ठरवले की आपण निवडणूक लढवावी, तर त्यावेळीच आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचेही पार्सेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी धनंजय रेडकर यांनी बोलताना पेडणे सेवा अंतर्गत मुख्य अभियंते उत्तम प्रभाकर पार्सेकर हे पेडणेवासीयांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. त्यानंतर त्यांनी सर्वांची मने जिंकल्यानंतर ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे स्पष्ट केले. पेडणेवासियांची सेवा करणे हाच मूळ उद्देश उत्तम पार्सेकर यांचा आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.