For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्सव स्पेशल सर्वच रेल्वेंना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद

10:59 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
उत्सव स्पेशल सर्वच रेल्वेंना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद
Advertisement

सर्व मार्गांवर रेल्वे फुल्ल : रेल्वेच्या उत्पन्नात भर

Advertisement

बेळगाव : दिवाळी व सलग सुट्या आल्याने गावी परतणाऱ्यांची लगबग सुरू होती. रविवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई, बेंगळूर, पुणे व हैदराबाद येथून गावी दाखल झालेल्या प्रवाशांनी रेल्वेस्थानक फुलून गेले होते. रेल्वेचे तिकीट बुकिंग फुल्ल असल्याने जनरल डब्यातून तारेवरची कसरत करत प्रवाशांनी बेळगाव गाठले. यावर्षी लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीजनिमित्त साप्ताहिक सुटीला जोडून सुट्या आल्याने गावी परतणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-बेंगळूर व बेंगळूर-जोधपूर या मार्गावर विशेष रेल्वेसेवा सुरू केली होती. यामुळे प्रवाशांना बेळगावपर्यंतचा प्रवास सुखकर ठरला. नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूरमधील प्रवाशांची सोय केली असली तरी मुंबई व पुण्याहून बेळगावला येणाऱ्यांचे मात्र हाल झाले.

शनिवारी रात्रीपासून रेल्वेप्रवाशांची तुडुंब गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी व रविवारी सकाळीही शेकडो प्रवासी रेल्वेने बेळगावमध्ये दाखल झाले. सकाळच्या सत्रात बेंगळूर-बेळगाव, बेंगळूर-मिरज (चन्नम्मा एक्स्प्रेस) त्याचबरोबर विशेष रेल्वेने बेंगळूरमधील प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. तर दादर-म्हैसूर व दादर-हुबळी या रेल्वेने मुंबई-पुण्यातील प्रवाशांनी बेळगाव गाठले. सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेसने हैदराबाद परिसरातील प्रवासी दाखल झाले. त्यामुळे शनिवारी व रविवारी सकाळी बेळगाव रेल्वेस्थानक गर्दीने फुलले होते. नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सोडलेल्या उत्सव स्पेशल रेल्वेला प्रवाशांनी तुफान प्रतिसाद दिला. बुकिंग सुरू केल्यापासून अवघ्या तासाभरातच बुकिंग वेटिंगवर सुरू होते. बेंगळूर-बेळगाव उत्सव स्पेशल रेल्वे पूर्ण क्षमतेने भरून आल्याने नैर्त्रुत्य रेल्वेलाही महसूल मिळाला आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित व किफायतशीर असल्याने यावेळी रेल्वेला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसून आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.